For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेंबूरमध्ये बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

07:15 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
चेंबूरमध्ये बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला आग  चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Advertisement

मुंबई : मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरात रविवारी सकाळी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. मोनोरेल स्थानकाजवळ झालेल्या या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Advertisement

ही बस भाडेतत्त्वावर बेस्टच्या ताफ्यात कार्यरत असून देवनार आगारातून ‘श्री मारुती ट्रॅव्हल्स’कडून चालवली जात होती. मार्ग क्रमांक ए-365 वरून महुल गाव ते ट्रॉम्बे असा प्रवास सुरू असताना चालकाला बसच्या केबिनखालून धूर येत असल्याचे जाणवले.

बॅटरी बॉक्समध्ये ठिणगी पडल्याने आग

चालकाने तातडीने बस थांबवून तपासणी केली असता बॅटरी बॉक्समध्ये ठिणगी पडून विद्युत बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आग वाढू लागली. बसमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बसमध्ये उपलब्ध असलेल्या 3 अग्निशामक सिलिंडरचा वापर करून सुमारे 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी बॅटरीची जोडणी तोडून ती बसमधून बाहेर काढली. त्यानंतर स्थानिक पोलीस, बेस्टचे अधिकारी आणि महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले.

यापूर्वीही बसला आग लागण्याच्या घटना

बेस्टच्या बसला आग लागण्याची ही अलीकडच्या काळातील पहिली घटना नाही. मे महिन्यात कुर्ला आगारात स्विच मोबिलिटीकडून चालवण्यात येणाऱ्या रिकाम्या इलेक्ट्रिक डबल-डेकर बसला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली होती.

त्याच महिन्यात सायन-प्रतीक्षानगर आगारात 2 सीएनजी बसना अवघ्या एका तासाच्या अंतराने आग लागली होती. या घटनांनंतर बेस्ट प्रशासनाने ताफ्यातील बसच्या सुरक्षेची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. बस रस्त्यावर पाठवण्यापूर्वी तिची सखोल तपासणी करण्यावरही भर देण्यात आला होता.

दरम्यान, बेस्ट बसच्या अपघातांच्या घटना सातत्याने चर्चेत असताना चेंबूरमधील या घटनेत चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

Advertisement

.