बर्लिन चित्रपटाचा ट्रेलर जारी
हेरगिरीवर आधारित कहाणी
हेरगिरीवर आधारित थ्रिलर चित्रपट ‘बर्लिन’चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. याची कहाणी 90 च्या दशकात नवी दिल्लीत रशियन राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल सभरवाल यांनी केले आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना झी5 वर पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि यिप्पी की याय मोशन पिक्चर्सकडून करण्यात आली आहे.
ट्रेलरच्या प्रारंभी एका मूकबधिर युवकाला विदेशी हेर असल्याच्या संशयावरुन पकडण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्यासाठी साइन लँग्वेज येणाऱ्या तज्ञाला पाचारण करण्यात येतो, जो अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना विचारण्यास मदत करतो, परंतु तो स्वत:च एका कटाला बळी पडत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
बर्लिन चित्रपटात अपारशक्ती खुराना, इश्वाक सिंह, राहुल बोस, अनुप्रिया गोयंका, कबीर बेदी समवेत अनेक कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील. या चित्रपटाला मामी आणि स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आले आहे. चित्रपटात साइन लँग्वेज तज्ञाची भूमिका अपारशक्ती खुरानाने साकारली आहे.