For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रोत्सव आजपासून

10:48 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रोत्सव आजपासून
Advertisement

देवीच्या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण : आज सकाळी सूर्योदयाला अक्षतारोपण : नागरिकांचा उत्साह शिगेला

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

बेनकनहळ्ळी, गणेशपूर व ज्योतीनगर गावची महालक्ष्मी यात्रा तब्बल 33 वर्षांनंतर होत असून मंगळवार दि. 23 रोजी सूर्योदयाला सकाळी 7 वा. 1 मि. देवीचा विवाह सोहळा (अक्षतारोपण) मोठ्या उत्साहात होणार असून या भागात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या मंगलदिनी बेनकनहळ्ळी येथे गावच्या मध्यवर्ती लक्ष्मी मंदिरासमोर हा विवाह संपन्न होणार आहे. ही यात्रा 9 दिवस म्हणजेच दि. 23 एप्रिलपासून 1 मेपर्यंत आहे. अक्षतारोपणानंतर श्री महालक्ष्मी आकर्षक रथावर विराजमान होणार आहे. यानंतर वाद्यवैभव, कुरबरांचे ढोल पथक, भंडाऱ्याची उधळण करत मिरवणुकीने रथ गणेशपूरला नेण्यात येणार आहे. पुरुष व महिला पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होणार असून याची तयारी यात्रा कमिटी, युवक-युवती मंडळे, महिलावर्ग व बालगोपाळ यांनी केली आहे. यात्रा कमिटीने विभागवार बैठका घेऊन जागृती केली आहे. सायंकाळी रथ मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर गावच्या पश्चिमेला सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या बाजूला असलेल्या भव्य पटांगणात लक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान होणार आहे. गदगेच्या ठिकाणी आकर्षक राजवाड्याप्रमाणे मंडपाची उभारणी केली आहे. या मंडपाची उभारणी ‘अंदाज’ डेकोरेटर्सचे विशाल जांगळे यांनी केली आहे. विद्युत रोषणाई आधुनिक तंत्रज्ञान वापरून केली आहे. दर्शनासाठी पुरुष व महिलांसाठी वेगळे विभाग केले आहेत. लक्ष्मी गदगेवर विराजमान झाल्यानंतर ओटी भरणे कार्यक्रम  होणार आहे. पटांगण प्रशस्त असल्याने भाविकांना  त्रास होणार नाही. परंतु यात्रा कमिटी व पोलीस प्रशासनामार्फत भाविकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी, चार चाकी व इतर वाहनांना या भागात मज्जाव असून गावच्या विविध मार्गांवरील योग्य ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. त्याच ठिकाणी वाहने पार्क करावीत, असे कळविले आहे. या मिरवणुकीत ग्रामस्थ, महिला, यात्रा कमिटी, ग्रा.पं. माजी लोकप्रतिनिधी व युवक मंडळांचा सहभाग असणार आहे.

Advertisement

लक्ष्मीदेवी यात्रोत्सव अंकाचे आज प्रकाशन

बेळगाव शहरालगत असलेल्या बेनकनहळ्ळी गावच्या लक्ष्मी यात्रेनिमित्त दै. तरुण भारतमार्फत यात्रा विशेषांकाची आठ पानी पुरवणी मंगळवार दि. 23 रोजी सकाळी सूर्योदयाला गावातील सर्व मान्यवर, यात्रा कमिटी, ग्रा. पं. कमिटी, शेतकरीवर्ग व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रकाशित केली जाणार आहे. या अंकात गावातील मंदिरे, रथ, मूर्ती यांचा आवर्जून उल्लेख असून कमिटीने केलेल्या कार्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. दै. तरुण भारतमार्फत यात्रा कमिटीला शुभेच्छा दिल्या असून येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत केले आहे.

बेनकनहळ्ळी महालक्ष्मी मूर्तीला चांदीचे अलंकार अर्पण : सरस्वतीनगर ‘एकता’ मंडळाचा उपक्रम : चांदीचे सव्वा लाख रुपयांचे अलंकार

बेनकनहळ्ळी येथील यात्रा तब्बल 33 वर्षांनंतर भरत असून बेनकनहळ्ळी क्षेत्रात गणेशपूर, ज्योतीनगर हा भाग येतो. या भागात बरीचशी उपनगरे झाली असून सरस्वतीनगर, महालक्ष्मीनगर, चोपडे ले आऊट हा भाग महानगरपालिका हद्दीला लागला आहे. सरस्वतीनगरमधील एकता मंडळाने येथील सर्व महिलांची संघटना करून कार्याची विभागणी केली. यात्रा कालावधीत आपण कोणती सेवा द्यावी यासाठी विभागवार बैठका घेऊन तयारी ठेवली आहे. भाविकांना कोणतीही अडचण भासू नये तसेच यावर्षी कडक उन्हाळा जाणवत असल्याने पाण्याची सुविधा पुरविण्यासाठी  आखणी केली आहे. या भागातील यात्रा कमिटीच्या सूचनेनुसार कार्याला वाहून घेतले आहे. याच सर्व महिलांनी एकत्र येऊन सव्वा लाख रुपयांचे चांदीचे अलंकार महालक्ष्मी मूर्तीसाठी बनविले. हे दागिने सवाद्य मिरवणुकीने पारंपरिक वेशभूषा परिधान करून बेनकनहळ्ळी येथील महालक्ष्मी मूर्तीला अर्पण केले. हा सोहळा पाहण्यासारखा होता. भंडाऱ्याची उधळण करत सर्व महिलांनी एकत्रितपणे हा सोहळा साजरा केला. या चांदीच्या दागिन्यात पादुका, छत्री, पितळी निरांजन, पितळी परात, लक्ष्मीमूर्तीस किमती साडी-चोळी, श्रीफळ, पानविडा अर्पण केला. यामध्ये ग्रा. पं. उपाध्यक्षा सायराबानू हुक्केरी, सुजाता कंग्राळकर, नंदिनी चोपडे, पार्वती नेवगेरी, काजल पाटील, अनुराधा देसाई, स्नेहल कंग्राळकर, श्रुती कारेकर, सुजाता देसाई, लता पाटील, पुष्पलता पाटील, राजश्री पाटील व असंख्य महिलांनी पुढाकार घेऊन अलंकार अर्पण केले. या महिलांना येथील सामाजिक कार्यकर्ते व यात्रा कमिटीने सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.