महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

11:51 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विवाहसोहळा मंगलमय वातावरणात : पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी : आकर्षक रथोत्सव मिरवणूक

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर गावांच्या एकत्रित महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भंडाऱ्याच्या उधळणीने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सूर्योदयाला सकाळी 7.01 वाजता अक्षतारोपणाचा सोहळा पार पडला. यावेळी देवीचा जयघोष करत, ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. विवाह संपन्न होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विद्युतरोषणाईने परिसरात झगमगाट पसरला होता. उपस्थित भाविकांना महालक्ष्मीचा विवाह सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता यावा यासाठी टीव्ही स्क्रीनची सोय करण्यात आली होती. बेनकनहळ्ळी पंचक्रोशीतील गणेशपूर, ज्योतीनगर, महालक्ष्मीनगर, सरस्वतीनगर, सावगाव, सुळगा (हिं.), आंबेवाडी भागातून भाविक उपस्थित होते. यामुळे प्रत्येक गल्लीत भाविकांची गर्दी झाली होती.लग्नसोहळ्याचे पौरोहित्य राजेश कुलकर्णी (हलकर्णी) तर वेदमूर्ती दीपक कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, शिवानंद पुजारी, अवधूत कुलकर्णी यांनी केले. अत्यंत सुमधूर आवाजात मंगलाष्टके गाऊन त्यांनी उपस्थित सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. ठरलेल्या वेळेत अक्षतारोपण होताच पारंपरिक वाद्यांच्या गजराने परिसर दुमदुमला. सुळगा (हिं.) येथील कुरबरांचे ढोल पथक या कार्यक्रमात शोभून दिसत होते. महालक्ष्मीदेवीचे वेळेत लग्न लावल्याने पुरोहितांचे अभिनंदन केले जात होते.

 लक्ष्मीदेवी लग्नसोहळा उत्साहात

सोमवार दि. 22 रोजी सायंकाळी महालक्ष्मीदेवीचे देवकार्य, हळदी कार्य  कार्यक्रमाला महिलांनी मोठा सहभाग दर्शविला होता. गावातील पाच सुवासिनींच्या अमृतहस्ते हळद लावण्यात आली. मंगळवारी प्रात:काली लग्नकार्याची लगबग चालू होती. यावेळी सालंकृत कन्यादान करण्याकरिता सुतार व ग्रामस्थ, पंच यांच्यावतीने देवीला किमती मानाची साडी नेसवून सोन्याचे अलंकार घातले. धार्मिक विधी संपन्न होताच लग्न सोहळा थाटात पार पडला. यानंतर विठ्ठल रखुमाई व मारुती मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मी मंदिराच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन देवस्की पंच कमिटीमार्फत करण्यात आले. यानंतर सर्व भक्तगणांनी गणेश, दुर्गादेवी, विठ्ठल, दत्ताची आरती म्हटली. सकाळच्या सत्रातील लग्न सोहळा पार पडताच लक्ष्मीमूर्ती रथात विराजमान झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी सुळगा (हिं.) येथील कुरबरांचे ढोल पथक सज्ज होते.

यात्रा कमिटीचे सुयोग्य नियोजन

आकर्षकपणे सजविलेला रथ ओढण्यासाठी महिलांनीही सहभाग दर्शविला. युवक वर्ग पारंपरिक वेशभूषा करून भंडाऱ्याची उधळण करत रथ ओढत होता. यात्रा कमिटीने सुयोग्य नियोजन केल्याने रथाचे मार्गक्रमण व्यवस्थित होत होते. हा रथ गावच्या पूर्वेला बेळगाव, बेळगुंदी रस्त्यापर्यंत आणण्यात आला. यानंतर महालक्ष्मीदेवीची मूर्ती सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसविण्यात येऊन मिरवणूक गणेशपूर भागात गेली. या ठिकाणी सर्वत्र स्वच्छता ठेवण्यात आली होती. ज्योतीनगर भागात सर्वत्र रांगोळी व पताका लावण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी विविध मंडळांनी व संस्थांनी स्वागत कमानी व बॅनर्स लावले होते. येथील रस्त्याच्या दुतर्फा भाविक महालक्ष्मीदेवीचा जल्लोष करीत होते. मिरवणूक मार्गातील अडथळे निवारण्यासाठी हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत होते. विद्युततारांचा अडथळा दूर करून रथाला मार्ग मोकळा करून दिला जात होता.

आज गदगेवर विराजमान होणार

मिरवणूक गणेशपूर, अयोध्यानगर व जुन्या गल्लीतून फिरून सूर्यास्ताला बेनकनहळ्ळी येथे आली. त्यानंतर महालक्ष्मी देवी पुन्हा रथात विराजमान झाली. बुधवार दि. 24 रोजी सकाळी पुन्हा सुभाष गल्ली व मारुती गल्लीत रथ फिरणार असून मारुती गल्लीमार्गे बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या भव्य पटांगणात उभारलेल्या शामियान्यातील गदगेवर विराजमान होणार आहे. यावेळी महालक्ष्मीदेवी यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष मोनाप्पा पाटील, उपाध्यक्ष आनंद पाटील, खजिनदार जोतिबा देसुरकर, सल्लागार बाळू देसुरकर, लक्ष्मण खांडेकर, कल्लाप्पा पाटील, महेश पाटील, शंकर पाटील, नागेश देसुरकर, रामा पाटील, महेश कोलकार, कल्लाप्पा देसुरकर, बाळासाहेब चोपडे, युवराज पाटील, आनंद देसुरकर, नामदेव देसुरकर, लक्ष्मण पाटील, सहदेव हिरोजी, परशराम पाटील, आनंद कोलकार, मोहन कांबळे, लक्ष्मण मंडलिक, भरमा पाटील, पंडित पिसाळे, मनोहर पिसाळे, जोतिबा देसुरकर, चंद्रकांत पाटील, राहुल देसुरकर, रमेश देसुरकर, आनंद जाधव, आप्पाजी कंग्राळकर, परशराम कोलकार, त्याचबरोबर ग्रामस्थ, महिला, युवावर्ग, आजी-माजी लोकप्रतिनिधी व विविध संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांचे योग्य नियोजन

रहदारीवर नियंत्रण ठेवून मिरवणूक शिस्तबद्धपणे जाण्यासाठी ग्रामीण व कॅम्प पोलिसांनी परिश्रम घेतले. यावेळी सी. पी. आय. जनगौडा व पी. एस. आय. चनय्या देवूर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सूचना करून सर्वत्र नियंत्रण ठेवले. बेळगाव-बेळगुंदी (रामघाट मार्ग) हा एकमेव मार्ग असल्याने याच मार्गावरून रथाची मिरवणूक काढताना रहदारीवर नियंत्रण ठेवून सहकार्य केले.

‘तरुण भारत’च्या लक्ष्मीदेवी यात्रोत्सव विशेषांकाचे प्रकाशन

बेनकनहळ्ळी येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सवानिमित्त तरुण भारतने मंगळवारी आठ पानी रंगीत महालक्ष्मी यात्रोत्सव विशेषांक प्रकाशित केला. या अंकाचे प्रकाशन लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा संपताच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यात्रा कमिटी अध्यक्ष मोनाप्पा पाटील, उपाध्यक्ष आनंद पाटील, जोतिबा देसूरकर (खजिनदार), एपीएमसी माजी सदस्य बाळू देसूरकर, कमिटी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. बेळगाव- बेळगुंदी रोड (रामघाट रोड) या ठिकाणी पुन्हा काहींनी आग्रह करून या लक्ष्मीयात्रा पुरवणी अंकाचे जल्लोषात स्वागत केले. यामध्ये मुख्याध्यापक मुगळीकर, निवृत्त शिक्षक रमेश देसूरकर व पुरवणी संकलन केलेले वार्ताहर प्रकाश बेळगुंदकर व ग्रामस्थ यांचा सहभाग होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article