For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी लक्ष्मीदेवी यात्रेची आज सांगता

10:23 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी लक्ष्मीदेवी यात्रेची आज सांगता
Advertisement

सायंकाळी सिमेकडे प्रयाण होणार : आठ दिवसांत हजारो भक्तांनी घेतले देवीचे दर्शन

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

भंडाऱ्याच्या उधळणीत, ढोल ताशा व पारंपरिक वाद्य तसेच धनगरांचे ढोलपदक आणि देवीचा जयघोष करत दि. 23 एप्रिल रोजी चालू झालेल्या बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर या गावच्या लक्ष्मीदेवी यात्रेची आज सांगता होणार आहे. यासाठी ग्रामस्थ व कमिटी जय्यत तयारीला लागले आहेत. बुधवार दि. 1 मे रोजी सायंकाळी 4 वाजता श्री लक्ष्मीदेवी सीमेकडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे सकाळच्या सत्रात मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मीदेवीची पूजाअर्चा व महाआरती केली जाणार आहे. प्रत्येकाच्या घरोघरी गोडधोड पदार्थ बनवले जाणार असून मोठ्या संख्येने या सांगता सोहळ्याला ग्रामस्थ व भाविक उपस्थित राहणार आहेत. बेनकनहळ्ळी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतला आहे. या आठ दिवसात हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले असून सुख, शांती, समृद्धी व पावसासाठी प्रार्थना केली.

Advertisement

राजकीय पुढाऱ्यांनी घेतले देवीचे दर्शन

खास करून लोकसभा निवडणूक असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी देखील आवर्जून दर्शनासाठी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेबाळकर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश शेट्टर तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील दर्शन घेतले. सर्व भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावे या उद्देशाने यात्रा कमिटीने सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेनकनहळ्ळीच्या बाजूला असलेल्या प्रशस्त जागेत राजवाड्याच्या स्वरूपात शामियाना उभारून लक्ष्मीदेवी आसनस्थ होणाऱ्या गदगेची जागा मोठ्या चौथऱ्यात बांधण्यात आली आहे.

यात्रेच्या यशस्वीतेसाठी कमिटीचे प्रयत्न

यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी विशेष परिश्रम घेत आहे. यात्रेच्या कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला. यासाठी वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, कॅम्प पोलीस स्टेशन तसेच सिक्युरिटी व ग्रामस्थांनी अत्यंत शिस्तबद्ध यात्रा करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व गावातील देवस्की पंच यांनी देखील मोलाचे सहकार्य यात्रा यशस्वी करण्यासाठी केले आहेत या सर्वांच्या प्रयत्नातूनच ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या यात्रोत्सवात महिलांचे योगदान सर्वात मोलाचे ठरले आहे.

Advertisement
Tags :

.