बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस बेळगावशीही जोडली जावी
खासदार जगदीश शेट्टर यांचा रेल्वेमंत्र्यांकडे प्रस्ताव
बेळगाव : बेंगळूर-मुंबई या मार्गावर सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आहे. या दोन महानगरांना रेल्वेसेवेद्वारे जोडले जाणार आहे. ही एक्स्प्रेस बेळगाव शहरातून धावल्यास याचा फायदा येथील नागरिकांना होणार असल्याचे पत्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बेंगळूरचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी काही दिवसांपूर्वी बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. सध्या सुरू असलेली उधम एक्स्प्रेस ही सोलापूर-बागलकोट मार्गे धावत असल्यामुळे याचा फायदा महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशलाही होत आहे. परंतु, कर्नाटकातील केवळ 15 टक्केच भागामध्ये ही एक्स्प्रेस धावते.
त्यामुळे नवीन एक्स्प्रेस सुरू करताना ती तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी-धारवाड, बेळगाव, मिरज, पुणे या मार्गे धावावी, अशी मागणी पत्राद्वारे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. बेळगावमध्ये व्हीटीयू, आरसीयू तसेच अनेक इंजिनिअरिंग, मेडिकल, डेंटल कॉलेजीस असून औद्योगिक क्षेत्रासह नामांकित केएलई हॉस्पिटल आहे. ही एक्स्प्रेस सुरू झाल्यास बेळगावच्या नागरिकांना मुंबई तसेच बेंगळूर येथे ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे. 1200 किलोमीटरपैकी 650 किलोमीटरचा प्रवास हा कर्नाटकातून होणार असल्याने याचा रेल्वे मंत्रालयाने विचार करावा, असे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. आरएसएस ही संघटना राष्ट्र निर्माणासाठी कार्य करत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी विनाकारण आरएसएसवर टीका करून त्यावर बंदी घालण्याचा विचार करू नये. सरकार चालविण्यात अपयश येत असल्यामुळेच दिशा भरकवटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.