बंगालकडे 33 व्यांदा संतोष करंडक
जेतेपदाच्या लढतीत केरळवर एकमेव गोलने मात
वृत्तसंस्था/ हैदराबाद
बलाढ्या पश्चिम बंगालने राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमधील आपले वर्चस्व कायम राखत पुन्हा एकदा संतोष ट्रॉफी पटकावली. येथे झालेल्या अंतिम सामन्यात बंगालने केरळचा 1-0 असा एकमेव गोलने पराभव करीत 33 व्यांदा हा करंडक पटकावला.
रॉबी हंसदाने उत्तरार्धातील जादा वेळेत हा एकमेव विजयी गोल नोंदवला. आदित्य थापाने बॉक्समध्ये हेडरवर ताबा घेत रॉबीने अगदी जवळून चेंडू जाळ्यात मारला. बंगालच्या या खेळाडूचा हा स्पर्धेतील 12 वा गोल होता. स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा मानही त्यानेच मिळविला.
पूर्वार्धात दोन्ही संघांना फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. 58 व्या मिनिटाला बंगालने मिळविलेली फ्री किक टार्गेटपासून थोडक्यात हुकली तर 62 व्या मिनिटाला त्यांनी बॉक्सच्या जरा बाहेर आणखी एक फ्री किक मिळविली. पण सदोष नेमबाजीमुळे त्याचाही त्यांना लाभ घेता आला नाही. बंगालने गोलकोंडी फोडून आघाडी घेतल्यानंतर केरळने एक फ्री किक मिळविली, पण त्यांचा फटका क्रॉसबारवरून बाहेर गेल्याने त्यांच्या समर्थकांची निराशा झाली.
दोन्ही संघांनी या स्पर्धेत लौकिकाला साजेसा फॉर्म दाखविला असून दहापैकी 9 सामने त्यांनी जिंकले आहेत. अंतिम फेरी गाठताना त्यांनी केवळ एक सामना अनिर्णीत राखला. स्पर्धेचा इतिहास पाहता या टप्प्यावर बंगालने नेहमीच वर्चस्व गाजविले आहे. पण अलीकडच्या काळात सातवेळा ही स्पर्धा जिंकणारा केरळ संघ त्यांच्यापेक्षा वरचढ ठरला आहे. केरळने 2017-18 व 2021-22 मध्ये बंगालचा पराभव करून संतोष करंडक पटकावला होता. मात्र येथील सामन्यात बंगालने त्यांच्यावर एकमेव गोलने मात करून त्या पराभवाचा वचपा काढला आहे.