बंगाल टायगर्सचा विजय
वृत्तसंस्था/राऊरकेला
हिरो पुरस्कृत हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात रुपिंदरपाल सिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बंगाल टायगर्सने गोनासिकाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात रुपिंदरपाल सिंगने दोन्ही गोल नोंदविले. रुपिंदरपाल सिंगने 31 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर तर 48 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर बंगाल टायगर्सचे गोल केले. गोनासिकातर्फे एकमेव गोल मनप्रित सिंगने केला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत गोनासिकाला पहिला पेनल्टी कॉर्नर उथप्पाने मिळवून दिला. विष्णूकांत सिंग, जॅक
वॉलेर आणि ड्रेपर या त्रिकुटाने गोनासिकाच्या आक्रमक खेळाची सूत्रे स्वीकारली होती. 15 व्या मिनिटाला बंगाल टायगर्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण सुगजितला याचा फायदा उठविता आला नाही. रुपिंदरपाल सिंगने 31 व्या मिनिटाला बंगाल टागर्सला आघाडी मिळवून देताना पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. बंगाल टायगर्सला ही आघाडी फारवेळ राखता आली नाही. मनप्रितसिंगने गोल नोंदवून गोनासिकाला बरोबरी साधून दिली. 48 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक बंगाल टायगर्सला मिळाला आणि रुपिंदरपाल सिंगने या संधीचा अचूक फायदा घेत आपल्या संघाला आघाडी मिळवून देत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केला.