‘गृहलक्ष्मी“चा लाभ घेणाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : राज्य सरकारच्या पंचहमी योजनेपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. मृत्यू झालेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने संबंधितांची माहिती देण्याची सूचना पीडीओ आणि अंगणवाडी शिक्षिकांना करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांकडून मंजुरीपत्र, आधारकार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स घेतले जात आहे.
राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेच्या बँक खात्यात दरमहा 2000 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश महिलांचा मृत्यू झाला असूनदेखील संबंधितांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कुटुंबप्रमुख महिलेचा मृत्यू झाला असल्यास संबंधित घरातील दुसऱ्या महिलेला कुटुंबप्रमुख म्हणून रेशनकार्डमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मृत्यू होऊनदेखील ज्यांच्या बँक खात्यात गृहलक्ष्मी योजेनेचे पैसे जमा होत आहेत. त्याची माहिती अंगणवाडी शिक्षिका आणि पीडीओंना घेण्याची सूचना करण्यात आली आहे. संबंधित माहिती महिला व बालकल्याण खात्याकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची नोंद केली जाणार आहे