बेन डकेटचे शतक, साजिद खानचे 4 बळी
फिरकीसमोर इंग्लंडचा डाव गडगडला, दिवसअखेर 6 बाद 239
वृत्तसंस्था/ मुल्तान, पाकिस्तान
बेन डकेटने शतक झळकवले असले तरी साजिद खान व नोमन अली यांच्या भेदक फिरकीपुढे मधली फळी कोसळल्याने इंग्लंडची दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर 6 बाद 239 अशी स्थिती झाली असून ते अद्याप 127 धावांनी पिछाडीवर आहेत. डकेटने 114 धावांचे योगदान दिले तर पाकच्या साजिद खानने 86 धावांत 4 बळी मिळविले.
या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने कमरान गुलामने पदार्पणातच शतक नोंदवल्याने दिवसअखेर 5 बाद 259 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून पाकने दुसऱ्या दिवसाच्या खेळास पुढे प्रारंभ केला आणि त्यात उर्वरित फलंदाजांनी आणखी 107 धावांची भर घातल्यानंतर पाकचा पहिला डाव उपाहारानंतरच्या सत्रात 366 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडच्या जॅक लीचने 4 बळी मिळविले तर जलद गोलंदाज कार्सेने 50 धावांत 3, मॅथ्यू पॉट्सने 2 बळी मिळविले.
पाकच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना बरेच फ्रस्टेट केले. आमेर जमीलने 37 जमविल्या तर नोमन अलीने 32 धावा काढल्या. पाकची आदल्या दिवशीची नाबाद जोडी मोहम्मद रिझवान (41) व सलमान अली आगा (31) लवकर बाद झाल्यानंतर आमेर जमालने अलीसमवेत 49 धावांची भागीदारी केली जेमी स्मिथने घेतलेल्या एका अप्रतिम झेलवर रिझवान बाद झाला. पाकने उपाहारापर्यंत 99 धावांची भर घातली. उपाहारानंतर मात्र त्यांचा डाव लगेचच संपुष्टात आला. संघाने 12 पराभवाची मालिका संपवण्यासाठी आपल्या संघात तीन स्पिनर्स व एक वेगवान गोलंदाज खेळवला आहे.
क्रॉली व डकेट यांनी इंग्लंडला 73 धावांची मजबूत सलामी दिली. क्रॉली 27 धावा काढून बाद झाला तर डकेटने नंतर शतक पूर्ण केले. त्याने 129 चेंडूत 114 धावा जमविताना 16 चौकार मारले. इंग्लंडची स्थिती 2 बाद 211 अशी भक्कम असताना साजिद अली व नोमन यांच्या ऑफब्रेकसमोर त्यांची घसरगुंडी उडाली आणि त्यांची स्थिती 6 बाद 225 अशी झाली. साजिद खानने 10 चेंडूत 3 बळी मिळविले, त्यात जो रूट (34), डकेट व हॅरी ब्रुक (9) यांचा समावेश होता. पुनरागमन करणारा कर्णधार बेन स्टोक्सही फार काळ टिकला नाही. नोमन अलीच्या डावखुऱ्या फिरकीवर तो केवळ एक धाव काढून बाद झाला. दिवसअखेर इंग्लंडने 6 बाद 239 धावा जमविल्या असून जेमी स्मिथ 12 व ब्रायडन कार्से 2 धावांवर खेळत होता.
इंग्लंडच्या डकेटने मात्र फिरकीसमोर स्वीप शॉट्सचा सढळ वापर केला आणि रूटसमवेत 86 धावांची भागीदारी केली. रूटने पहिल्या कसोटीत 262 धावांची विक्रमी खेळी केली होती, त्याने या सामन्यात साजिद खानच्या चेंडू यष्टींवर ओढवून घेतल्याने त्याची खेळी संपुष्टात आली. नंतर लगेचच डकेटने एज केलेला चेंडू स्लिपमध्ये टिपला गेला. पहिल्या कसोटीतील त्रिशतकवीर ब्रुकही साजिदचा बळी ठरला. आत वळलेल्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याआधी क्रॉलीने 27 धावा जमविल्या, खानने त्याला धावचीत करण्याची सुवर्णसंधी दवडली. त्यानंतर एकदा त्याला पायचीतच्या अपिलातून रिव्ह्यूमुळे जीवदान मिळाले होते. मात्र त्याला या जीवदानांचा लाभ घेत मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही.
संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव 123.3 षटकांत सर्व बाद 366 : कमरान गुलाम 118, सईद आयुब 77, रिझवान 41, आमेर जमाल 37, सलमान आगा 31, नोमन अली 32, अवांतर 12, जॅक लीच 4-114, कार्से 3-50, पॉट्स 2-66, बशिर 1-85.
इंग्लंड प.डाव 53 षटकांत 6 बाद 239 धावा : बेन डकेट 114, जो रूट 34, क्रॉली 27, ऑली पोप 29, अवांतर 11, साजिद खान 4-86, नोमन अली 2-75.