लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात!
सांगली :
महिलांसाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेतून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र तासगाव तालुक्यातील येळावीतील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये लाडक्या बहिनीचे पैसे चक्क भावाच्या खात्यात झाल्याने शाखेमध्येच भाऊ-बहीण हातघाईवर आल्याचा प्रकार समोर आला.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने २१ ते ६५ वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी योजना लागू करण्यात आली. महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण योजना' कायम राहणार असल्याचे जाहीर केले. लाडकी बहिण योजनेची रक्कम निवडणुकीनंतर ही महिलांच्या खात्यावर जमा होत आहे.
जिल्ह्यातील काही महिलांचे उशिरा अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या मंजुरीनंतर पंधराशे रुपये खात्यावर जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे राष्ट्रीयकृत बँकांसह सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा होत आहेत. सर्व महिलांचे पैसे जमा होत असताना यामधील एका महिलेने माझे पैसे का जमा झाले नाहीत. याबाबतची खात्री जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन केली. त्या महिलेचे पैसे भावाच्या खात्यावर जमा झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले हा प्रकार समजतात संतापलेल्या बहिणीने थेट भावाला फोन लावला लाडकी बहीणचे पैसे तुझ्या खात्यावर जमा झाले आहेत, त्याला बँकेत बोलावून घेतले. माझे पैसे तुझ्या खात्यावर कसे जमा झाले असा जाब भावाला विचारला. याप्रकारावरून दोघांमध्ये हमरी तुमरीही सुरू झाली. संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोघांना शांत करीत दोन्ही खात्याबाबतची माहिती घेतली असता लाडकी बहिणीचा अर्ज भरताना चुकीची कागदपत्रे दिल्याने हा प्रकार घडला. तुम्हीच चूक केल्याचे सांगितल्या नंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी वादावर पडदा टाकला.