जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कर्जासाठी लागतील 26 अब्ज
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाहीच. उलट लाडक्या बहिणींना 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, अशी लोकप्रिय घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. एकट्या कोल्हापूर जिह्याचा विचार करता, 6 लाख 62 हजार 773 लाडक्या बहिणी आहेत. प्रत्येकीला 40 हजार रुपयांचे कर्ज याप्रमाणे तब्बल 26 अब्ज 51 कोटी 9 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. मात्र, या कर्ज योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अद्याप शासनस्तरावर स्पष्टता आलेली नाही.
जिल्ह्यातील 6 लाख 96 हजार 777 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 6 लाख 62 हजार 773 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले तर 34 हजार 4 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 1 लाख 49 हजार 682 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ हातकणगले तालुक्यातील 1 लाख 34 हजार 569 महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे. तर गगनबावडा तालुक्यातील सर्वाधिक कमी म्हणजे 6 हजार 705 महिला लाभार्थी आहेत. याशिवाय पोर्टलवरील महिलांची संख्या वेगळी आहे.
घोषणेनुसार 40 हजार रुपयांचे भांडवल मिळाले तर लाडक्या बहिणी स्वत:चा व्यवसाय करुन आपल कुटुंब उभं करतील. परंतु शासनाने उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना 40 हजार रूपये कर्ज द्यावे. तसेच कर्ज दिले म्हणून महिना दिला जाणारा 1 हजा 500 रूपयांचा हप्ता सुरूच ठेवावा, अशी मागणी लाडकी बहीण योजनेतील महिलांकडून होत आहे.
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
- वैशिष्ट्ये
योजनेचे नाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
उद्देश : महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन
आर्थिक मदत : दरमहा 1,500 रुपये (वर्षाला 18,000 रुपये)
कर्ज योजना : 40,000 रुपये स्वयंरोजगारासाठी
कोल्हापूर जिह्यातील लाभार्थी : 6 लाख 62 हजार 773 महिला
कर्जाची रक्कम : 26 अब्ज 51 कोटी 9 लाख 20 हजार रुपये
जिह्यातील लाडकी बहीण योजनेचा आढावा
जिह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जिह्यातील एकूण 6 लाख 96 हजार 777 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. यापैकी 6 लाख 62 हजार 773 महिलांचे अर्ज मंजूर झाले, तर 34 हजार 4 अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले.
- लाभार्थींची आकडेवारी :
करवीर तालुका: 1 लाख 49 हजार 682 महिला (सर्वाधिक)
हातकणंगले तालुका: 1 लाख 34 हजार 569 महिला
गगनबावडा तालुका: 6 हजार 705 महिला (सर्वात कमी)
- अंमलबजावणी व्हावी
लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला एक ते दहा तारखेच्या आत मिळावा, तसेच 40 हजार रूपये कर्ज देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी, यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, यासंदर्भात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणींना कर्ज द्यावे.
- रूपाली शिकतोडे (लाभार्थी)
- तालुकानिहाय लाडकी बहीण महिलांची अॅपवरील संख्या
तालुका आलेले अर्ज मंजूर अर्ज नामंजूर अर्ज
कागल 59452 56131 3321
शिरोळ 75557 72383 3174
शाहूवाडी 34950 32860 2090
आजरा 23876 22328 1548
हातकणगले 138262 134569 3693
राधानगरी 39850 37836 2014
गडहिंग्लज 42994 39497 3497
करवीर 155827 149682 6145
भुदरगड 29161 27479 1682
पन्हाळा 52339 41160 3179
चंदगड 37300 34143 3159
गगनबावडा 7209 6705 504
एकूण 696777 662773 34004