लाडक्या बहिणीचे २१०० रूपयांकडे लक्ष
विधानसभेच्या यशानंतर महायुती सरकारकडून महिलांच्या अपेक्षा वाढल्या
कोल्हापुरातील 12 लाख 35 हजार महिलांनी केले मतदान
कोल्हापूर/ अहिल्या परकाळे
महायुती सरकारने लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहा १५०० रूपये असे चार महिन्यांचे 7 हजार 500 रूपये जमा केले. विधासभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारादरम्यान महायुतीच्या संकल्पपत्रात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहिण योजने अंतर्गत 1500 रूपयांऐवजी 2100 रूपये देण्यात येणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींचे २१०० रुपयांच्या हफ्त्याकडे लक्ष लागले आहे.
लाडक्या बहिणींनी महायुतीला मतांचे भरभरून दान दिले. त्यामुळे महायुतीचे सर्वच उमेद्वार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. आता निवडणुतील वचनानाम्यानुसार सरकार २१०० रुपये देऊन सरकार वचनपूर्ती कधी करणार ? लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीपुर्वी 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना महायुती सरकारने प्रतिमहा दीड हजार रूपये दिले. नोव्हेंबरपर्यंतचे चार महिन्यांचे 7 हजार 500 रूपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रतिमहा 2100 रूपयांचा हप्ता जमा करण्याची घोषणा महायुतीने केली आहे. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये 2100 रूपयांचा हप्ता मिळणार का ? याकडे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या सर्वच नेत्यांनी लाडकी बहीण योजना कशी फायद्याची आहे, हे अनेक माध्यामातून महिलांना पटवून दिले परिणामी राज्यभरात बहुतांश तर कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या सर्व दहा जागा निवडून आल्या आहेत. महिला उमेद्वारांची मतेच गेमचेंजर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी महायुती सरकारला दिलेला शब्द पाळत डिसेंबर महिन्यात २१०० रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करणार का ? याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
तीन मोफत सिलेंडरकडेही लक्ष
‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’च्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. मोफत सिलेंडर मिळणार असे एसएमएसही आले आहेत. परंतू अद्याप मोफत सिलेंडरचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत.
राज्यभरातून १ कोटी ३५ लाख महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यापैकी १ कोटी ३ लाख महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. कोल्हापुरातील १६ लाख ३५ हजार ६२४ पैकी १२ लाख ३५ हजार १० महिलांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आपल्याला दरमहा २१०० रूपये देणार या अपेक्षेपोटी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पुन्हा एकदा महायुती सरकारच्या हातात राज्याची सत्ता दिली आहे.