For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साहित्य सुरक्षित, प्रवास निर्धास्त!

06:39 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
साहित्य सुरक्षित  प्रवास निर्धास्त
Advertisement

मध्यवर्ती बसस्थानकात डिजिटल लगेज लॉकर सेवा : पर्यटक, खरेदीदार, प्रवाशांना मोठा दिलासा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात खरेदी, पर्यटन किंवा अन्य कामासाठी येणाऱ्या प्रवाशांना आता साहित्य घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकात डिजिटल लगेज लॉकर सेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना आपले साहित्य काही तासांसाठी सुरक्षित ठेवून शहरात मोकळेपणाने फिरता येणार आहे. बस किंवा रेल्वेची वेळ होईपर्यंत शहरात थांबणाऱ्या प्रवाशांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement

‘मेक ईन इंडिया’ संकल्पनेवर आधारित ही डिजिटल लॉकर प्रणाली सुऊवातीला पुणे आणि मुंबई येथील बसस्थानकांवर सुरू करण्यात आली होती. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता हुबळी व बेळगाव बसस्थानकातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या साहित्य व्यवस्थापनाची प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित व वेळेची बचत करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

काऊंटरची गरज नाही

पारंपरिक लॉकर रूममध्ये काऊंटरवर जाऊन साहित्य जमा करावे लागते. मात्र डिजिटल लॉकरमध्ये स्वयंसेवा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया करता येते. डिजिटल लॉकरचा क्मयूआर कोड स्कॅन करून किंवा टचस्क्रीनवर लॉकरचा आकार व वापराचा कालावधी निवडता येतो. डिजिटल पेमेंट केल्यानंतर लॉकर उपलब्ध होते. सामान ठेवल्यानंतर प्रवाशाला पिन दिला जातो. याच पिनच्या साहाय्याने नंतर लॉकर उघडून सामान परत घेता येते.

पॅक, हँडबॅग आणि ब्रिफकेससाठी मध्यम आकाराचे तर मोठे लगेज व ट्रॉली बॅग ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे लॉकर उपलब्ध आहेत. 6, 12 व 24 तासांचे पर्याय देण्यात आले असून लॉकर आगाऊ आरक्षित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. हॉटेलमधून चेकआऊट केल्यानंतर काही तास शहरात फिरणारे पर्यटक, बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक, तसेच पुढील बस किंवा रेल्वेची वेळ होईपर्यंत शहरात थांबणारे प्रवासी यांच्यासाठी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरणार आहे. साहित्य सोबत घेऊन बाजारपेठेत किंवा पर्यटनस्थळी फिरण्याची अडचण आता कमी होणार आहे.

साहित्य लॉकरमध्ये सुरक्षित ठेवून प्रवासी बेळगावातील बाजारपेठा, धार्मिकस्थळे आणि पर्यटनस्थळांना भेट देऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांची सोय वाढण्याबरोबरच शहरातील पर्यटन व स्थानिक व्यापारालाही अप्रत्यक्षपणे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ड्यूरॉल्टच्या सहकार्याने ही डिजिटल लॉकर प्रणाली उभारण्यात आली आहे. लॉकर युनिटवर मदतीसाठी संपर्क तपशील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे युनिटवर कित्तूर किल्ला व गोकाक धबधब्याची छायाचित्रे लावली आहेत. त्यामुळे साहित्य सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची ओळख प्रवाशांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

डिजिटल पेमेंट, क्मयूआर कोड, टचस्क्रीन व पिन आधारित प्रवेश यामुळे लॉकर वापरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. प्रवाशांना सामानाची चिंता बाजूला ठेवून आपली कामे, खरेदी किंवा पर्यटन पूर्ण करता यावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही सुविधा बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये महत्त्वाची भर ठरणार आहे.

आकारानुसार लॉकरचे भाडे-

आकार      6 तास                   12 तास              24 तास

मध्यम        40 रुपये               80 रुपये          120 रुपये

मोठे          60 रुपये              110 रुपये          160 रुपये

अतिमोठे    90 रुपये           160 रुपये             220 रुपये

Advertisement
Tags :

.