बेळगुंदी येथे ‘मार्कंडेय’ला पूर
शेकडो एकर जमीन पाण्याखाली : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील राकसकोप परिसरातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला बेळगुंदी येथे पूर आला व या नदीचे पाणी थेट शिवारात शिरले आहे. त्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. गुऊवारी पावसाचा जोर कमी झाला तरीही पाणी केवळ थोड्या प्रमाणातच कमी झाले आहे. पिके मात्र अजूनही पाण्याखालीच आहेत. अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. तालुक्यात रविवारपासून पावसाचा जोर वाढला होता. सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली. अनेक गावातील संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला होता मात्र गुऊवारी पावसाने विश्र्रांती घेतल्यामुळे पाण्याचा ओघ ओसरत आहे. बुधवारी तर राकसकोप, येळेबैल या गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.
नदीचे पाणी थेट शिवारात
या पावसामुळे बुधवारी सायंकाळी बेळगुंदी येथील मार्कंडेय नदीच्या पुलावर पाणी आले व हे पाणी थेट शिवारात शिरले. त्यामुळे शिवारातील भात, रताळी, बटाटा, मका आदी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातरोप लागवड करण्यासाठीही काही शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली होती ही रोप लागवडीची भातेही पाण्याखालीच गेली आहेत त्यामुळे आता रोप लागवडीसाठी रोप आणायचे कुठून? असा प्रŽ शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
पावसाची विश्रांती, बळीराजाला दिलासा
गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर गुरुवारी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही ठिकाणी शिवारात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यास खरीप हंगामातील पिके घ्यायची कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. गुरुवारी पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतल्यामुळे हळूहळू पाण्याचे प्रमाण कमी होणार आहे. मात्र पाण्याखाली गेलेली पिके कुजून गेली आहेत. खराब झाली आहेत. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बटाटा व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान काही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती हे भात पीक उगवून आले होते. त्यामध्ये कोळपणी करण्यात आली होती. मात्र याच कालावधीत या भात पिकामध्ये पाणी साचून भात पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन, बटाटा व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाने अशा पद्धतीनेच तीन-चार दिवस विश्रांती दिल्यास. खरीप हंगामातील कामांना पुन्हा जोर येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे