मुलींच्या मिनी ऑलिम्पिकमध्ये बेळगावची बाजी
14 वर्षांखालील राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा, बेंगळूरनंतर बेळगावने पटकाविला चषक, कारवार जिल्हा संघाचा 4-0 असा पराभव
वार्ताहर/किणये
बेंगळूर येथे कर्नाटक ऑलिम्पिक संघटना व युथ सक्षमीकरण सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षांखालील तिसऱ्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने कारवार जिल्हा संघाचा 4-0 असा पराभव करुन तिसऱ्या मिनी ऑलिम्पिक चषकाचा मानकरी ठरला. मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगाव हा बेंगळूरनंतर दुसरा संघ ठरला आहे. बेंगळूर येथे झालेल्या रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत हावेरी जिल्ह्याचा 7-0 असा पराभव करुन बेळगाव जिल्हा संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. या सामन्यात मारिया मुजावर, इंद्रायणी पावनोजी यांनी प्रत्येकी 2 तर अवनी सानिकोप्प, इफा अत्तार, सायली कुडतरकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्या कारवार संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला इंद्रायणी पावनोजीच्या पासवर इफा अत्तारने पहिला गोल केला. 17 व्या मिनिटाला अवनी सानिकोप्पच्या पासवर इफा अत्तारने दुसरा गोल केला. तर 22 व्या मिनिटाला मारिया मुजावरच्या पासवर तिसरा गोल करुन 3-0 ची आघडी पहिल्या सत्रात मिळवित इफाने पहिली हॅट्ट्रीक नोंदविली. दुसऱ्या सत्रात 42 व्या मिनिटाला वैभवी सायनेकरच्या पासवर इंद्रायणी पावनोजीने चौथा गोल करुन 4-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात कारवार जिल्हा संघाला गोल करण्यात अपयश आले.
कारण बेळगावच्या भक्कम बचावफळीमुळे त्यांनी केलेल्या सर्व चढाया बचावफळीने परतावून लावल्याने या सामन्यात गोल करण्यात अपयश आले. गेले दोन वर्षे ही स्पर्धा बेंगळूर संघाने जिंकली होती. पण तिसऱ्या स्पर्धेत बेळगावने अपराजित राहून या चषकावर आपली मोहर उमटविली. पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत बेळगावने एकही सामना न हरता आपली विजयी घौडदौड कायम राखली. या संघात वैभवी सायनेकर, तेजल हंसी, मारिया मुजावर, मयुरी तिम्मापूर, मालिका बाडीवाले, जानवी चव्हाण, प्रांजल हजरी, अवनी सानिकोप्प, वैष्णवी होसमनी, तनिष्का सप्रे, इफा अत्तार, रोहिणी कांबळे, इफा बडेभाई, सायल कुडतरकर, क्लेस्ट्रा मधुराई, वैष्णवी संकपाळ, इंद्रायणी पावनोजी, श्रद्धा पाटील आदी खेळाडूंचा समावेश असून संघाचे व्यवस्थापक म्हणून मानस नाईक तर प्रशिक्षक म्हणून हेमांशी गौर यांनी या संघाला योग्य मार्गदर्शन केले. या विजयी संघाचा बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे खास गौरव होणार आहे.
विजयी परंपरा कायम
फुटबॉल क्षेत्रात बेळगाव जिल्हा संघाने बेंगळूरबरोबर बेळगावचेही नाव उज्वल केले आहे. 2018-19 साली धारवाड येथे पुरुषांच्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेवून विजेतेपद पटकाविले होते. त्याचप्रमाणे सी. एम. चषक स्पर्धेत सुद्धा विजेते व उपविजेतेपद पटकाविले होते. बेळगावने आपली विजयी परंपरा कायम राखली होती. पण आता मुलींनीही हम भी कुछ कम नही, या म्हणीनुसार प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेवून विजेतेपद पटकाविले आहे. या विजयी संघाला बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात येत असून अशीची परंपरा यापुढेही राखावी, अशा शुभेच्छा बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब यांनी दिली.