तरुण भारत डिजिटलच्या माध्यमातून बेळगावचा गणेशोत्सव पोहोचला देश-विदेशात
थेट प्रक्षेपणाला मिळाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; ; पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळपासून ‘तरुण भारत डिजिटल‘च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. शहरातील धर्मवीर संभाजी चौक तसेच विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख ठिकाण असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरातून मिरवणुकीची दृश्ये देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथे ‘तरुण भारत डिजिटल‘च्या वतीने भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते.
या व्यासपीठावरून विसर्जन मिरवणुकीतील विविध घडामोडी, गणेश मंडळांचे आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण, मर्दानी खेळ आणि गणेशभक्तांचा उत्साह यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर कपिलेश्वर तलाव परिसरातून विसर्जनाच्या क्षणांचेही थेट प्रसारण करण्यात आले. ‘तरुण भारत डिजिटल‘च्या या थेट प्रक्षेपणाला शनिवारी सायंकाळपर्यंत यूट्यूब आणि फेसबुक पेजवर एकूण तब्बल दोन लाखांहून अधिक ह्यूज मिळाले होते.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व दैनिक तरुण भारतच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीधर रवी शंकर यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर विविध अधिकारी व लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र, आयजीपी संदीप पाटील, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर, किरण गावडे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंके, हॅथवे चॅनेलचे हरिश गुलबानी, भाजप नेते धनंजय जाधव, किरण जाधव, अल्ट्रा ड्रॉपचे संचालक मनीष गुप्ता यांच्यासह इतर ख्यातनाम व्यावसायिक आणि मान्यवरांनी व्यासपीठाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुण भारत डिजिटल मीडियाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
बेळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण केवळ बेळगाव किंवा परिसरापुरते मर्यादित न ठेवता देशातील तसेच परदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यामुळे बेळगावपासून दूर असलेल्या गणेशभक्तांनाही आपल्या शहरातील ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीचा थेट अनुभव घेता आला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि माजी आमदार संजय पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर करून बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा आणि विसर्जन मिरवणुकीचे दर्शन व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा हा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्ये, विविध मंडळांचे आकर्षक देखावे आणि गणेशभक्तांच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. ‘तरुण भारत डिजिटल‘च्या थेट प्रक्षेपणामुळे शहरातील भाविकांसह देश-विदेशातील गणेशभक्तांनाही या ऐतिहासिक सोहळ्याशी जोडता आले.