For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर सवलतीचा बेळगावकरांनी घेतला लाभ

12:13 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर सवलतीचा बेळगावकरांनी घेतला लाभ
Advertisement

मनपाकडे जूनमध्ये पावणे आठ कोटींचा कर जमा : तीन महिन्यात 36 कोटी घरपट्टी संकलित

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेला कर जमा करण्याचे उद्दिष्ट दरवर्षी दिले जाते. त्यानुसार महानगरपालिका कर जमा करण्यासाठी प्रयत्न करीत असते. यावेळी जून महिन्यामध्ये घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केले. 7 कोटी 74 लाख 39 हजार 610 रुपये या महिन्यात महानगरपालिकेकडे कर जमा झाला आहे. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. दरवर्षी पहिल्या महिन्यामध्ये कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत दिली जाते. यावर्षी देखील देण्यात आली.

मात्र, एप्रिल महिन्यामध्ये सर्व्हर डाऊन समस्या तसेच लोकसभा निवडणुकीमुळे कर भरणे अशक्य झाले होते. केवळ आठ दिवसच कर भरण्यासाठी उपलब्ध झाले होते. त्या काळात कर भरण्यासाठी साऱ्यांनीच गर्दी केली होती. सवलत घेण्यासाठी धडपडत असताना एप्रिल महिना संपल्याने सारेजण नाराज झाले होते. पुन्हा एक महिन्याची वाढ करावी, अशी मागणी जनतेतून करण्यात आली. त्यानुसार महानगरपालिकेने नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठविला. नगरविकास खात्याने तातडीने त्याला सहमती दिली नाही. त्यामुळे विनासवलत मे महिन्यामध्ये अनेक मालमत्ताधारकांनी कर भरला होता.

Advertisement

त्यानंतर जून महिन्यामध्ये सरकारने पुन्हा 5 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले. त्यानुसार नगरविकास खात्याने महानगरपालिकेला पत्र पाठविले. याबाबत जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे जून महिन्यामध्येही कर मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. एकूण 7 कोटी 74 लाख 39 हजार 610 रुपये जून 30 पर्यंत कर जमा झाला आहे. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत 36 कोटी 2 लाख 75 हजार 673 रुपये कर जमा झाला असून बऱ्यापैकी उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एकूण 75 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 40 टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित महिन्यांमध्ये जास्तीत जास्त कर जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.