विभागीय क्रिकेट स्पर्धेत बेळगावला दुहेरी मुकुट
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धा : सेंट पॉल्स,सेंट मेरीजा विजेते संघ
बेळगाव : विजापूर येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे बेळगाव विभागीयस्तरीय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत बेळगाव जिल्हा (सेंटपॉल्स) संघाने तर 17 वर्षांखालील माध्यमिक गटात (सेंट मेरीज) संघाने विजेतेपद पटकाविले. तर बेळगाव जिल्हा मुलींच्या संघाने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानले. विजापूर येथे घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षाखालील संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात धारवाड संघाचा 15 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 55 धावा केल्या. त्याला उत्तर देताना धारवाडने 8 षटकात 7 गडी बाद 39 धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजापूर संघाने चिकोडी संघाचा 3 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात विजापूर संघाने 8 षटकात 8 गडी बाद 39 धावा केल्या.
त्याला उत्तर देताना बेळगाव संघाने 7.2 षटकात 5 गडी बाद 40 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. 17 वर्षांखालील माध्यमिक गटात बेळगाव जिल्हा संघाने चिकोडी जिल्हा संघाचा 7 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चिकोडीने 8 षटकात 6 गडी बाद 46 धावा केल्या. त्याला उत्तर देताना बेळगाव संघाने 7.1 षटकात 3 गडी बाद 47 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बागलकोट संघाने विजापूरचा 13 धावांनी पराभव केला. बागलकोट प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 52 धावा केल्या. त्याला उत्तर देताना विजापूरने 8 षटकात 7 गडी बाद 40 धावा केल्या. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने 8 षटकात 4 गडी बाद 60 धावा केल्या. त्याला उत्तर देताना बागलकोट संघाने 8 षटकात 8 गडी बाद 39 धावा केल्या. या स्पर्धे दरम्यान विजापूर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.