टीईटी विरोधात बेळगावचे शिक्षक दिल्लीत
जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनात घेणार सहभाग
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाने शाळा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असणे सक्तीचे केले होते. सरकारी शाळांमधील शिक्षकांना टीईटीची सक्ती नको, यासाठी दिल्ली येथे सोमवार दि. 24 रोजी देशव्यापी आंदोलन होणार असून यामध्ये भाग घेण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील 25 शिक्षक दिल्ली येथे पोहोचले आहेत. कोणत्याही परिस्थितीत टीईटीची सक्ती होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. एका निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व सरकारी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. परंतु, शिक्षक पात्रता परीक्षा ही काहीशी कठीण असल्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना हे कसे काय शक्य आहे? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता.
याविरोधात दिल्ली येथील जंतरमंतर येथे भव्य आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये देशभरातील शिक्षक सहभागी होत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आल्याच्या विरोधात बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने विरोध करण्यात आला होता. बेळगावमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली 25 जणांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासोबतच टीईटीची सक्ती नको, अशी मागणी ते करणार आहेत.