‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने बेळगाव दुमदुमले; दुर्गामाता दौडीची सांगता
विजयादशमीच्या दिवशी पहाटेपासूनच मारुती मंदिर परिसरात धारकऱ्यांची गर्दी झाली होती. पारंपरिक फेटे परिधान करून धारकरी दौडीसाठी सज्ज झाले होते. प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते सौरभदादा करडे यांच्या हस्ते मारुती मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर ध्वज चढवून प्रेरणामंत्र म्हणण्यात आला आणि दौडीला प्रारंभ झाला.
मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली आणि गोंधळी गल्ली या मार्गांवरून दौड मार्गस्थ झाली. शंभूतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून समारोप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील आणि शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे सौरभदादा करडे यांचा सत्कार करण्यात आला.
देशभरात दुर्गामाता दौड विस्तारण्याचा संकल्प
मनोगत व्यक्त करताना प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी श्री दुर्गामाता दौडीमागील प्रेरणा आणि उद्देश स्पष्ट केला. आदरणीय गुरुजींच्या आदेशानुसार यंदा देशभरात दौड सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला असून, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, ओडिशा आणि जम्मू येथेही दौडीला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
“28 वर्षांपूर्वी पेरलेले दुर्गामाता दौडीचे बीज आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारले आहे,” असे सांगत त्यांनी या उपक्रमाच्या वाढत्या व्याप्तीचा उल्लेख केला. सर्वांनी एकजुटीने धर्मकार्य पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
शिवव्याख्याते सौरभदादा करडे यांनी धारकऱ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. दुर्गामाता दौडीत ज्या उत्साहाने सहभागी होता, त्याच उत्साहाने गडकोट मोहिमेतही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आदरणीय गुरुजींनी पाहिलेले 32 मण सुवर्ण सिंहासनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. “आपण एकसंघ राहून धर्मकार्य केले पाहिजे. विभागून गेलो, तर हे कार्य अपूर्ण राहील,” असा संदेश त्यांनी दिला. दुर्गामाता दौडीची तुलना वारीशी करत त्यांनी धारकऱ्यांनी ही दौड सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
कायमस्वरूपी चांदीची ध्वजकाठी अर्पण
यंदाच्या श्री दुर्गामाता दौडीसाठी सौ. शुभदाताई गावडे यांनी कायमस्वरूपी चांदीची ध्वजकाठी अर्पण केली. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
दौड यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या योगदान देणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर आरती आणि ध्येयमंत्र म्हणण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज उतरवून यंदाच्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.