एचआयव्ही बाधितांमध्ये बेळगाव राज्यात दुसऱ्या स्थानी
खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष, सुशिक्षितांचा समावेश
बेळगाव : राज्यामध्ये एचआयव्ही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालावरून निदर्शनास आले आहे. एचआयव्ही बाधितांमध्ये सुशिक्षितांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले असून यामध्ये युवक व युवतींचा समावेश आहे. राज्यामध्ये बेंगळूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यामध्ये एकूण 4,23,369 जण एचआयव्ही बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये 1,82,973 पुरुष, 2,15,519 महिलांचा समावेश आहे. 87,266 युवक आणि 10,376 तरुणींना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये सुशिक्षितांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. एमबीबीएस, अभियांत्रिकी, रोजगाराभिमुख कोर्स करणाऱ्यांमध्ये एचआयव्हीची बाधा अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. एचआयव्ही बाधितांच्या संख्येत बेंगळूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून बेळगाव दुसऱ्या क्रमांकावर, बागलकोट तिसऱ्या स्थानावर, चौथ्या स्थानावर बळ्ळारी, पाचव्या स्थानावर विजापूर जिल्हा आहे. एचआयव्हीची बाधा होऊ नये यासाठी आरोग्य खात्याकडून जागृती केली जात आहे. तरीदेखील सुरक्षित उपाययोजनांची खबरदारी घेतली जात नसल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.