दोन धारकऱ्यांचा बेळगाव-रामेश्वरम सायकल प्रवास नऊ दिवसांत पूर्ण
सांबरा : अखंड भारत हिंदू राष्ट्र व्हावे व संभाजीराव भिडे गुरुजी यांचा रायगडावरील 32 मण सुवर्ण सिंहासन संकल्प पूर्ण व्हावा यासाठी ज्योतिर्लिंगाला साकडे घालण्यासाठी बाळेकुंद्री खुर्द व मुतगे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दोन धारकऱ्यांनी बेळगाव ते रामेश्वरम असा सायकल प्रवास केवळ नऊ दिवसांमध्ये पूर्ण केला आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील धारकरी ऋतिक पाटील व मुतगे येथील धारकरी पवन पाटील यांनी दि. 21 रोजी बेळगाव-रामेश्वरम सायकल प्रवासाला प्रारंभ केला होता. धारवाड, हुबळी, दावणगिरी, चित्रदुर्ग, तुमकूर, बेंगळूर, होसूर, सेल्वम, मदुराई मार्गे नवव्या दिवशी ते रामेश्वरमला पोहोचले. अखंड भारत हिंदू राष्ट्र व्हावे व रायगडावरील 32 मण सुवर्णसिंहासनाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी ज्योतिर्लिंगाला साकडे घातले. शेवटी कन्याकुमारी येथील रामसेतूला भेट देऊन सायकल प्रवासाची सांगता केली. बेळगाव ते रामेश्वरम अंदाजे बाराशे किलोमीटर अंतर त्यांनी सायकलने अवघ्या नऊ दिवसांत पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मागीलवर्षीही या दोघांनी बेळगाव ते केदारनाथ 2200 किलोमीटरचे अंतर सायकलवरून केवळ 18 दिवसांत पूर्ण केले होते.