बेळगाव पोस्ट विभागाकडून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सोय
पेन्शनधारकांना घरपोच सेवेची सुविधा
बेळगाव : पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हयात दाखला द्यावा लागतो. परंतु, बऱ्याचशा पेन्शनधारकांचे वय अधिक असल्याने त्यांना हा दाखला मिळविण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी बेळगाव पोस्ट विभागाने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या सेवेचा अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांनी लाभ घेतला आहे.
1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान डिजिटल लाईफ सर्टिफिकेट 4.0 अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन खात्याच्यावतीने या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. देशभरातील दोन हजारांहून अधिक शहरांमध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सोय केली आहे. आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून घरोघरी हयात दाखला दिला जात आहे.
बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीनेही ही सेवा दिली जात आहे. ज्यांना पोस्ट कार्यालयापर्यंत पोहोचणे शक्य आहे, त्यांना पोस्ट कार्यालयात सेवा देण्यात येत आहे. तर ज्यांना आरोग्याच्या समस्येमुळे कार्यालयापर्यंत जाता येत नाही अशा पेन्शनधारकांना घरोघरी लाईफ सर्टिफिकेट देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.