For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाजगोळी प्रकरणानंतर बेळगाव पोलीस सतर्क

06:30 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
हाजगोळी प्रकरणानंतर बेळगाव पोलीस सतर्क
Advertisement

बंद कारखान्यांचे तीन महिन्यांपूर्वीच झाले होते सर्वेक्षण : गैरप्रकार रोखण्यासाठी पाहणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

हाजगोळी, ता. चंदगड येथे एमडीएम तयार करणारा एक कारखाना महाराष्ट्र पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. यापूर्वी पुणे व मुंबई पोलिसांनी म्हैसूर व बेंगळूर परिसरातही छापे टाकून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केल्याची उदाहरणे आहेत. म्हैसूर व बेंगळूर येथील कारवाईनंतर बेळगाव पोलिसांनी या परिसरातही अमलीपदार्थांचे कारखाने सुरू आहेत का? याची पाहणी करण्यासाठी सर्व्हे केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी तर सुरुवातीपासूनच अमलीपदार्थमुक्त बेळगावसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इतर गुन्ह्यांबरोबरच गांजा, पन्नी, चरस, अफिम आदी अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांबरोबरच त्याचे सेवन करणाऱ्यांवरही कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. बेंगळूर व म्हैसूर परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असलेल्या बेळगावातही असे प्रकार सुरू असतील का? या संशयावरून सर्वेक्षण करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार तीन महिन्यांपूर्वी पोलीस, औषध नियंत्रण विभाग व औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथकांकडून बेळगाव शहर, उपनगर व तालुक्यातील बंद कारखान्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आजवर केलेली कारवाई लक्षात घेता पोल्ट्री फार्म किंवा एखाद्या बंद कारखान्यात अमलीपदार्थांचा कारखाना थाटला जातो. हा अनुभव लक्षात घेऊन बेळगाव परिसरातील बंद कारखान्यांचे सर्वेक्षण करून या कारखान्यांमध्ये विशेष पथकांकडून तपासणी करण्यात आली आहे.

गुप्तपणे चाललेल्या या तपासणी मोहिमेसाठी प्रत्येक पोलीस स्थानकातून तीन पोलीस बळ घेण्यात आले होते. खास करून केमिकल इंडस्ट्री चालवणाऱ्या व सध्या बंद पडलेल्या कारखान्यांना भेटी देण्यात आल्या आहेत. पोलीसस्थानकनिहाय कारखान्यांची यादी बनवून तपासणी करण्यात आली आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील 75 हून अधिक बंद कारखान्यांना अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

एखादा कारखाना चालवण्यासाठी कोणकोणत्या शासकीय विभागांची परवानगी लागते, त्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांना एकत्रित करून ही मोहीम राबविण्यात आली आहे. बेंगळूर व म्हैसूर येथील महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उभे करून महाराष्ट्रातून विशेष पथक येऊन कर्नाटकात अमलीपदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त करतात. आमच्या अधिकाऱ्यांना व गुप्तचर यंत्रणांना यासंबंधीची माहिती का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

याआधीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व तत्कालिन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनीही अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत कर्नाटक पोलिसांनी तरुणाईला नशेबाज बनविणाऱ्या अमलीपदार्थांच्या व्यावसायिकांना अद्दल घडविण्याची सूचना केली होती. बेळगावात यापूर्वी मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केल्याची उदाहरणे आहेत. हेमंत निंबाळकर जिल्हा पोलीसप्रमुख पदावर असताना आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता.

पोलीस आयुक्तांकडून यंत्रणा कामाला

बेळगावातून अनेक देशांना हशिश पाठवण्यात येत होता. गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही बेळगावातून अमलीपदार्थांचा पुरवठा केला जात होता. 25 वर्षांपूर्वी केंद्रीय यंत्रणांनी काकतीजवळ कोट्यावधी रुपयांचा मँड्रेक्सचा साठा जप्त केला होता. या दोन कारवायानंतर बेळगावात मोठी कारवाई झाली नसली तरी अशा टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून माहिती जमवण्याचे काम

पुणे येथील अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सने हाजगोळीत केलेल्या कारवाईनंतर बेळगाव पोलिसांनीही महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईसंबंधी माहिती जमवण्याचे काम हाती घेतले आहे. बेळगाव पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. हाजगोळीतील कारखान्यात बेळगाव येथील दोन तरुण काम करीत होते. यासंबंधीची माहिती मिळविण्यात येत आहे.

एमडीएमच्या बेळगाव कनेक्शनचा शोध

गेल्या तीन महिन्यांपूर्वीच सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून बंद कारखान्यांची पाहणी करून पोलिसांनी असे अ•s बेळगाव परिसरात सुरू झाले नाहीत ना? याची खात्री करून घेतली आहे. त्यावेळी बंद कारखान्यांमध्ये पोलिसांना गैरप्रकार आढळले नाहीत. हाजगोळी येथील कारवाईनंतर बेळगाव पोलीसही जागे झाले असून एमडीएमच्या बेळगाव कनेक्शनचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.