म्हादईसाठी बेळगावकर एकवटले, आम्हा गोमंतकीयांचे काय?
समाजकार्यकर्ते राजन घाटे यांचा सवाल : व्याघ्र क्षेत्र झाल्यास म्हादईचा प्रश्न मिटणार
पणजी : म्हादईचे पाणी वळवू नये, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यात विविध स्तरावरून लढा सुरू असताना आता याच प्रकल्पाला विरोध करत खुद्द बेळगावातील लोक एकवटले आहेत. कणकुंबी, खानापूर आदी भागांमधील नागरिकांसह प्रख्यात पर्यावरणवादी रिधिमा पांडे यांनीही या आंदोलानाला पाठिंबा दिला असून पाणी वळविण्याला विरोध केला आहे. अशावेळी आता गोमंतकीयांनी देखील याबाबत ठोस कृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी केले. मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शंकर पोळजी, मारियानो फेर्रांव आणि आलेक्स नोरोन्हा यांचीही उपस्थित होती.
गोव्याची बाजू झाली असती बळकट
म्हादई अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प साकारला असता तर ही परिस्थिती ओढवलीच नसती. म्हादईचे पाणी वळविण्याचाही प्रश्न निर्माण झाला नसता व पर्यायाने न्यायालयात गोव्याची बाजू बळकट झाली असती. परंतु सरकारी पातळीवर अक्षम्य चालढकल सुरू असल्याने ही परिस्थिती ओढविली आहे. अशावेळी आता खुद्द कर्नाटकाच्या अनेक भागातील लोकही या प्रकल्पाविरोधात एकवटू लागले आहेत, त्यावरून या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात येते, असे घाटे यांनी सांगितले. खरे तर कर्नाटकात 20 पेक्षा जास्त मोठ्या नद्या आहेत, तरीही तेथील लोक म्हादईचा प्रवाह वळवू नये यासाठी आंदोलन करत आहेत. दुर्दैवाने ज्या राज्याचा जवळपास निम्मा भाग म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहे तेथील लोक मात्र स्वत: कोणताही पुढाकार न घेता आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच मदार ठेऊन सुस्त राहिले आहेत, याची खंत वाटते, असे घाटे म्हणाले.
‘तो’ अधिकारी घरी गेला ते बरेच झाले
जो प्रकार गोमंतकीयांचा तोच येथील सरकारचाही आहे. हे सरकार म्हादईबाबत गंभीर नाही. भरीस त्यांनी एका अधिकाऱ्यास निवृत्तीनंतरही वारंवार सेवावाढ देऊन लाड पुरविले. मात्र मूळचा कर्नाटकातील असलेला तो अधिकारी पडमूर निघाला. त्याने या मातीशी प्रतारणा केली व आपल्या मातीशी इमान राखले. येथील सर्व माहिती तो कर्नाटकला पुरवत राहिला. त्यामुळे गोव्याचे प्रत्येक फासे उलटे पडत गेले. अखेर आम्ही प्रखर विरोध केल्यानंतर त्या अधिकाऱ्यास यंदा मुदतवाढ न देता घरी पाठविण्यात आले, असे घाटे यांनी सांगितले. आता त्याची जागा घेतलेल्या नवीन अधिकाऱ्याने तरी म्हादई वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावी, असे आवाहन घाटे यांनी केले. त्याचबरोबर गोमंतकीयांनी आपसातील सर्व मतभेद विसरून म्हादई वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत घाटे यांनी व्यक्त केले.