बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस आता नव्या रूपात
प्रवाशांच्या मागणीनुसार नवे डबे : एलएचबी कोचमुळे लांबपल्ल्याचा प्रवास होणार सुखकर
बेळगाव : बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस आता नव्या रूपात प्रवाशांना सेवा देणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या एक्स्प्रेसला मंगळवारपासून नवे एलएचबी कोच जोडण्यात आले. बेळगावच्या प्रवाशांनी नैर्त्रुत्य रेल्वेचे आभार मानत एलएचबी कोचचे स्वागत केले. नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने लांबपल्ल्याच्या गाड्यांना एलएचबी कोच जोडले जात आहेत. बेळगाव-बेंगळूर, कोल्हापूर-तिरुपती, मिरज-बेंगळूर यासह इतर एक्स्प्रेसला नवे एलएचबी डबे जोडण्यात आले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार आता बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेसलाही नवीन डबे देण्यात आले आहेत. मंगळवारी एलएचबी कोच असलेली पहिली एक्स्प्रेस म्हैसूर शहरापर्यंत धावली. बेळगावच्या प्रवाशांनी एलएचबी कोचचे स्वागत करून रेल्वेचे पूजन केले. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, बेळगाव कोअर डेव्हल्पमेंट टीमचे सदस्य अश्विन पाटील, अर्पण, जयसिंग रजपूत, सतीश शैलेश यलमाळी, श्रीधर हुलीकावी, विशाल यादव यांसह इतर उपस्थित होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय रेल्वेने एलएचबी कोच तयार केले आहेत. लाल रंगाचे रेल्वेचे डबे तयार करून त्यामध्ये प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना लांबपल्ल्याचा प्रवास करणे सोयीचे होत आहे.