बेळगाव : कुंदानगरी की गुन्हानगरी?
राजधानी बेंगळूरपाठोपाठ गुन्हेगारीत क्रमांक : समाजमनात भीतीचे वातावरण
बेळगाव : बेळगावसह राज्यात गुन्हेगारी प्रकरणांचा आलेख वाढता आहे. राजधानी बेंगळूरनंतर गुन्हेगारीत बेळगावचा क्रमांक लागतो. खून, खुनाचे प्रयत्न, लैंगिक अत्याचार, दंगली, प्रत्येक घटनेत बेंगळूरनंतर राज्यात बेळगावचा क्रमांक लागतो. चालू वर्षी केवळ आठ महिन्यात संपूर्ण राज्यात 815 खून झाले आहेत. क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार जानेवारी 2024 पासून ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात 815 जणांचा खून झाला आहे. तर लैंगिक अत्याचाराच्या 436 घटना घडल्या आहेत. खुनी हल्ल्याच्या 1929 घटना घडल्या असून राज्यात 2 हजार 482 दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. गेल्या आठ महिन्यात 4 हजार 677 पोक्सो प्रकरणे दाखल झाली आहेत. 1992 प्रकरणे अत्याचारासंबंधीची आहेत. हुंड्यासाठी 75 महिलांचा बळी गेला आहे.
राज्यात 4 हजार 568 हून अधिक फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत. तर राज्यात 15 हजार 575 चोरीचे गुन्हे घडले आहेत. अमलीपदार्थांची विक्री व वापर वाढला असून ते थोपविण्यासाठी पोलीस दलाने 2 हजार 497 प्रकरणे दाखल केली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या घटली आहे. सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत. 15 हजार 572 हून अधिक प्रकरणांमध्ये नागरिकांनी आपले पैसे गमावले आहेत. राज्यात स्त्राrभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. बेळगाव जिल्ह्यातही यासंबंधी एफआयआर दाखल झाले आहेत. गेल्या आठ महिन्यात 7 हजार 601 भ्रूण हत्येचे प्रकार घडले आहेत. सरकारी यंत्रणेची नजर चुकवून आणखी किती प्रकरणे झाली असतील, याचा अंदाज न केलेला बरा. एटीएम, महामार्गावर वाहने अडवून दरोडे, बँकांवर दरोड्यांचे 208 हून अधिक घटना घडल्या असून इतर ठिकाणी 1 हजार 253 दरोड्याचे प्रकार घडले आहेत.
गेल्या आठ महिन्यात कर्नाटकाची राजधानी बेंगळूरमध्ये 70 खून झाले आहेत. त्यानंतरचा क्रमांक बेळगावचा लागतो. बेळगाव शहर व जिल्ह्यात या काळात 50 जणांचे खून झाले आहेत. खुनी हल्ल्याच्या प्रयत्नांचे बेंगळुरात 401 घटना घडल्या आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात 112 घटना घडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात राजधानी बेंगळूरचा क्रमांक वरचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या 401 घटना घडल्या आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात ही संख्या कमी आहे. दंगल प्रकरणात मात्र बेळगावने बेंगळूरलाही मागे टाकले आहे. राजधानीत 150 दंगलीसंबंधीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 206 हून अधिक घटना घडल्या आहेत. प्रत्येक गुन्हेगारी प्रकरणात बेळगावचा क्रमांक बेंगळूरच्या पाठोपाठ लागतो. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.