For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-कोल्हापूर वारी, तरीही पोलिसांच्या हातावर तुरी!

10:21 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव कोल्हापूर वारी  तरीही पोलिसांच्या हातावर तुरी
Advertisement

घरफोड्या जोडगोळीचा वारंवार हिसका : सीसीटीव्हीमध्ये छबी कैद, अटकेसाठी पोलिसांना हवी जनतेची मदत

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात आंतरराज्य गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. खासकरून बंद घरांचा कडीकोयंडा तोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या काही टोळ्यांनी तर बेळगाव पोलिसांची डोकेदुखीच वाढविली आहे. गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासासाठी अनेक वैज्ञानिक आविष्कारांची मदत घेतली जात असली तरी पोलीस दलाला चकमा देण्यात हे गुन्हेगार आजवर तरी यशस्वी ठरले आहेत. एखाद्या गुन्हेगारी घटनेनंतर घटनास्थळावर उपलब्ध होणारा सुगावा, परिस्थितीजन्य पुरावे आदींमुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे तपास अधिकाऱ्यांना शक्य होते. यासाठी श्वानपथकाची मदत घेतली जाते. घटनास्थळावर मिळणाऱ्या गुन्हेगारांच्या हातांच्या ठशांवरून गुन्हेगार कोण? याचा छडा लावला जातो. अनेक वेळा ठशांवरून गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलीस दलाला यश येते. आता गुन्हेगारांनीही आपली कार्यपद्धत बदलली आहे. तपास अधिकाऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन ते गुन्हे करू लागले आहेत. घटनास्थळावर ठशांचे नमुने मिळू नयेत, यासाठी गुन्हे करताना हातमोजांचा वापर करू लागले आहेत. श्वानपथकाचीही दिशाभूल करण्यासाठी गुन्हेगार डोके लढवतात. तपास अधिकाऱ्यांची चाल ओळखून गुन्हेगार आपली वाटचाल ठरवू लागले आहेत. त्यामुळेच सहजपणे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलीस अधिकाऱ्यांना शक्य होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

18 एप्रिल रोजी अशोकनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 7 लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या गुन्हेगारांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यांची ही पहिलीच बेळगाववारी नव्हे. यापूर्वीही एका माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी तीन घरफोड्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले आहे. फुटेज मिळाले, त्यांची छबीही कॅमेऱ्यात कैद झाली तरी प्रत्यक्षात गुन्हेगार पोलिसांच्या हातात सापडत नाहीत, अशी स्थिती आहे. 23 डिसेंबर 2023 रोजी याच गुन्हेगारांनी कोल्हापूर परिसरातही घरफोड्या केल्या आहेत. त्यानंतर ही टोळी कोल्हापुरात फिरकली नाही. त्यांच्या बेळगाव वाऱ्या मात्र सुरू आहेत. सध्या बेळगाव व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस घरफोड्या करणाऱ्या जोडगोळीच्या शोधात आहेत. कोणत्याच ठिकाणी त्यांच्या हाताचे ठसेही मिळाले नाहीत. सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हे करताना ते हातमोजांचा वापर करतात, असे दिसून येते. घरफोड्या करणारे गुन्हेगार सहसा गुन्हे करण्याआधी घरांची रेकी करतात. मोटारसायकलवरून फिरून बंद घरांची पाहणी केली जाते. एक-दोन वेळा त्या घरासमोरून चक्कर मारली जाते. घराला कुलूप लावलेले आहे. घरात कोणीच नाही, याची खात्री पटल्यानंतर रात्री प्रत्यक्ष चोरी केली जाते. दोन राज्यांच्या पोलिसांना डोकेदुखी ठरलेले हे गुन्हेगारही मोटारसायकलवरून फिरतात. मात्र, आजवर ते पोलिसांना सापडले नाहीत.

Advertisement

आंतरराज्य टोळीतील दोघांचा धुमाकूळ

बेळगाव व उपनगरात कोठेही घरफोडी झाली तर यामागे प्रकाश पाटील या मूळच्या बेळगावचा व सध्या गोव्यात स्थायिक झालेल्या गुन्हेगाराचे नाव चर्चेत यायचे. बेळगाव पोलिसांनी अनेकवेळा त्याला अटक करून मोठ्या प्रमाणात चोरीचे दागिने जप्तही केले आहेत. आता आंतरराज्य टोळीतील दोघा जणांनी तर धुमाकूळ घातला आहे. सोलापूर येथील सुरेश शिवापुरे नामक अट्टल गुन्हेगार बेळगाव पोलिसांना हवा आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

चार महिन्यांपूर्वी अनगोळ, आनंदनगर, शहापूर परिसरात याच सुरेशने धुमाकूळ घातला होता. बेळगाव परिसरातील अनेक घरफोड्यांमध्ये सुरेशचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असले तरी प्रत्यक्षात त्याच्यापर्यंत पोहोचणे बेळगाव पोलिसांना शक्य होईना. तो महाराष्ट्र पोलिसांनाही हवा आहे. सुरेशचे नाव तरी समजले आहे. सध्या धुमाकूळ सुरू केलेल्या दोघा जणांविषयी कसलीच माहिती तपास अधिकाऱ्यांकडे नाही. त्यांना अटक झाली तर केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र-कर्नाटकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लागणार आहे. म्हणून बेळगाव पोलिसांनी या दोघा गुन्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी या टोळीच्या मागावर आहेत. जनतेला काही माहिती असल्यास किंवा संशय वाटल्यास 9480804107 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही क्षणात चोरी करून गायब

एखाद्या शहरात किमान तीन महिन्यांतून एक किंवा दोन वेळा चोरी करण्याचा या जोडगोळीचा शिरस्ता आहे. काही ठिकाणी सहा महिन्यांतून एकदा ते चोरीसाठी जातात. एखाद्या घराची रेकी केल्यानंतर जवळच असलेल्या एखाद्या हॉटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत ही जोडगोळी पार्टी करते. हॉटेल बंद झाल्यानंतर नशेत बाहेर पडणारे हे गुन्हेगार थेट रेकी केलेल्या घरापर्यंत पोहोचतात. काही क्षणात काम उरकून ते गायब होतात. पोलिसांना मिळालेल्या फुटेजवरून हे दोघे मोटारसायकलवरूनच फिरत असतात. याव्यतिरिक्त तपास अधिकाऱ्यांकडे इतर माहिती उपलब्ध नाही. पूर्वी पोलीस दलाकडे खबऱ्यांचे जाळे होते. आता काळानुरुप ‘खबरी’ हा प्रकार जवळपास नामशेष झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींचा सुगावा लागणे पोलीस दलाला कठीण जात आहे.

Advertisement
Tags :

.