For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वेमार्ग कामाला प्रारंभ करा

10:57 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव कित्तूर धारवाड रेल्वेमार्ग कामाला प्रारंभ करा
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन : नवीन रेल्वे सुरू करण्याबरोबरच विविध विकास योजनांवर चर्चा 

Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन : नवीन रेल्वे सुरू करण्याबरोबरच विविध विकास योजनांवर चर्चा 

बेळगाव : बेळगाव-कित्तूर-धारवाड नवीन रेल्वेमार्गासाठी असणारी योजना त्वरित प्रारंभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. तसेच इतर रेल्वेमार्गांवर रेल्वे सुरू करण्याबरोबरच विविध विकासाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी कित्तूर-धारवाड नवीन रेल्वेमार्गासंदर्भात चर्चा केली. दोन वर्षांपूर्वी या रेल्वेमार्गासाठी भूस्वाधीन प्रस्ताव देण्यात आला आहे. तरीदेखील राज्य सरकारकडून भूस्वाधीन प्रक्रिया राबविलेली नाही. रेल्वे खात्याकडे जमीन हस्तांतर करण्यात आलेली नाही. त्यामुळे योजना रेंगाळली आहे. बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वेमार्ग गरजेचा असून ही योजना त्वरित प्रारंभ करण्यात यावी, यासाठी जमिनी संपादन करून रेल्वे खात्याकडे हस्तांतर करण्यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

अनेक मार्गांवर रेल्वे सुरू करण्याची मागणी

बेळगावमध्ये विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ असून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, यासह केएलई रुग्णालय आहे. याबरोबरच औद्योगिकरित्या शहराचा विकास होत आहे. यासाठी नूतन रेल्वेमार्ग व इतर मार्गांवर रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार बेळगाव-बेंगळूर-बेळगाव वंदेभारत एक्स्प्रेस (सकाळी प्रारंभ, सायंकाळी परत), बेळगाव-पुणे-बेळगाव वंदेभारत एक्स्प्रेस (सकाळी प्रारंभ, सायंकाळी परत), बेळगाव-अयोध्या-बेळगाव (अयोध्या येथे नवीन राम मंदिर उभारण्यात आल्याने या भागातून राम मंदिरला भेट देणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असून या रेल्वेसेवेची गरज आहे), बेळगाव-पंढरपूर-बेळगाव रेल्वेसेवेमुळे या भागातील विठ्ठल-रुक्मिणी भक्तांना महाराष्ट्रातील पंढरपूरला जाण्याचे सोयीचे होणार आहे. यासाठी डेली एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात याव्यात. बेळगाव शहरातून केरळला प्रवास करणाऱ्या आणि येथे वास्तव्य करणाऱ्या मल्याळी नागरिकांच्या सोयीसाठी हुबळी-कोचीवेल्ली-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बेळगाव-चेन्नई-बेळगाव डेली एक्स्प्रेस, बेळगाव-वाराणसी-बेळगाव एक्स्प्रेस आठवड्यातून दोनवेळा, बेळगाव-जोधपूर-बेळगाव एक्स्प्रेस आठवड्यातून दोनवेळा अशी रेल्वेसेवा प्रारंभ करण्याची मागणी त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.