बेळगाव माझे आजोळ याचा आनंद
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे प्रतिपादन : राजू पवार डान्स अकॅडमीतर्फे कार्यक्रम
बेळगाव : कलाकारांना लोकांची मनोरंजनाद्वारे सेवा करायची असते. सर्वच कलाकार लोकांच्या मनोरंजनासाठी कार्य करत असतात. आपल्या क्षेत्रात सुरक्षितता नसून काही काळ काम असते, काही काळ नसते. मात्र, जेवढा वेळ काम मिळते त्या वेळेत आम्ही पूर्ण निष्ठेने काम करतो. बेळगाव माझे आजोळ असून मी बेळगावची आहे याचा आनंद आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केले. रविवारी मिलेनियम गार्डन, टिळकवाडी येथे राजू पवार डान्स अकॅडमीच्यावतीने ‘एक श्याम देश के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर राजू पवार, पूनम कलाणी, कृष्णा बिजवलकर आदी उपस्थित होते. बेर्डे म्हणाल्या, आपण गेल्या चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटविली आहे. त्यांचे चित्रपट अजूनही लोक आवर्जुन पाहतात. तसेच टीव्हीवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट लागला की सर्व कुटुंबीय एकत्र बसून पाहतो, असे लोक आपल्याला सांगतात, असेही त्या म्हणाल्या. प्रत्येक कलाकार हा आपल्या कलेच्या अनुभवांवर काम करत असतो. पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. मात्र आज तांत्रिकदृष्ट्या सिनेमा सुधारला असून चित्रपट मोठ्या बजेटमध्ये करण्यात येत आहेत. पूर्वी चित्रपटांचे बजेट कमी असायचे. मात्र त्या वेळेचे चित्रपटही हिट व्हायचे. आज व्हीएफएक्स, क्रोमा आदींच्या माध्यमातून अशक्य गोष्टी साध्य करता येत आहेत. यामुळे आज सिनेमाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मुलांनी डान्सच्या माध्यमातून आपला कलाविष्कार सादर केला. यावेळी मान्यवर, रसिक उपस्थित होते.