For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य-राष्ट्रीय संघटनांच्या भूमिकेला बेळगाव हॉटेल उद्योगाचा पाठिंबा

06:32 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्य राष्ट्रीय संघटनांच्या भूमिकेला बेळगाव हॉटेल उद्योगाचा पाठिंबा
Advertisement

अन्न वितरण व्यवसायातील बदलत्या परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर बैठक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

अन्न वितरण व्यवसायातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट व्यवसायासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशन आणि नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) उत्तर कर्नाटक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. तेथे विविध हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांनी स्विगी आणि झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर कंपन्यांकडे उच्च कमिशन, सवलत धोरणे, एकतर्फी व्यावसायिक अटी आणि रेस्टॉरंट व्यवसायाच्या शाश्वततेबाबत चिंता व्यक्त करून न्याय्य व पारदर्शक व्यावसायिक धोरणांची मागणी केली आहे. योग्य तो तोडगा न निघाल्यास काही रेस्टॉरंट्सनी या प्लॅटफॉर्मवरील सेवा स्थगित करण्याचाही इशारा दिला आहे.

चर्चेनंतर सदस्यांकडून एकमताने ठराव मंजूर

सविस्तर चर्चेनंतर उपस्थित सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करून न्याय्य, पारदर्शक व शाश्वत व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यासाठी एनआरएआय आणि कर्नाटक राज्य हॉटेल संघटनांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना बेळगाव हॉटेल उद्योगाचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

यावेळी एनआरएआय-उत्तर कर्नाटक विभागाचे प्रमुख अक्षय कुलकर्णी यांनी देशभरातील रेस्टॉरंट व्यवसायासमोरील प्रमुख समस्या मांडल्या. या समस्या केवळ रेस्टॉरंटच्या नफ्यापुरत्या मर्यादित नसून, ग्राहकांचे दर, पर्याय, स्थानिक उद्योगांचे अस्तित्व आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकतेवरही परिणाम करतात असे त्यांनी सांगितले. रेस्टॉरंट उद्योग, तंत्रज्ञान किंवा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या विरोधात नसून सर्व घटकांच्या हिताचा समतोल राखणाऱ्या व्यावसायिक धोरणांची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांना न्याय्य आणि पारदर्शक व्यवसाय पद्धतीचा लाभ मिळायला हवा

बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय पै यांनी सांगितले की, रेस्टॉरंट, फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर्स आणि ग्राहक हे या व्यवस्थेतील समान महत्त्वाचे घटक असून सर्वांना न्याय्य आणि पारदर्शक व्यवसाय पद्धतीचा लाभ मिळायला हवा. एकतर्फी किंवा मक्तेदारीची व्यावसायिक पद्धत दीर्घकाळ टिकणारी नसल्याचे त्यांनी नमूद केले आणि राज्य व राष्ट्रीय संघटनांच्या उपक्रमांना बेळगाव हॉटेल उद्योगाने अधिकृत पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला.

बैठकीत सर्व संबंधित घटकांशी सकारात्मक संवाद व सहकार्य कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संघर्ष नव्हे तर पारदर्शकता, परस्पर आदर, निरोगी स्पर्धा आणि शाश्वत विकास यावर आधारीत व्यावसायिक वातावरण निर्माण करणे हेच संघटनांचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बेळगाव हॉटेल उद्योग संपूर्ण पाठिंबा देईल

बैठकीच्या शेवटी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून न्याय्य व्यावसायिक धोरणांची अंमलबजावणी व्हावी यासाठी कर्नाटक राज्य हॉटेल संघटना आणि एनआरएआय करीत असलेल्या प्रयत्नांना बेळगाव हॉटेल उद्योग संपूर्ण पाठिंबा देईल, एका एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

बैठकीस बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय पै, एनआरएआय उत्तर कर्नाटक विभागप्रमुख अक्षय कुलकर्णी, बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, एनआरएआय उत्तर कर्नाटक विभागाचे सदस्य, बेळगावातील प्रमुख हॉटेल मालक व रेस्टॉरंट व्यावसायिक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.