बेळगाव-हिंडलगा रस्त्याची धूळदाण
ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात, दुरुस्तीची मागणी
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील महात्मा गांधी स्मारकापासून हिंडलगा गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याची धूळदाण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहने चालविणेही अवघड झाल्याने रात्रीच्यावेळी अपघात घडत आहेत. अपघातामुळे वाहनचालक जायबंदी होत असतानाही कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता करण्यासाठी निधी नसल्याचे कारण देत राज्य सरकारने हा रस्ता करावा, असे कॅन्टोन्मेंटकडून सूचविण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंटमधील अनेक रस्ते सध्या खड्डेमय बनले आहेत. सर्वात वर्दळीचा असणाऱ्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
वेंगुर्ला रोड मार्गे सावंतवाडी तसेच गोव्यातून येणारे नागरिक गांधी स्मारकाकडूनच शहरात येतात. त्यामुळे नागरिकांना कसरत करत दुचाकी व चारचाकी वाहने चालवावी लागत आहेत. खड्डे बुजविण्यासाठीही कॅन्टोन्मेंटकडून प्रयत्न होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कॅन्टोन्मेंट बैठकीतही यापूर्वी हा मुद्दा चर्चेला आला होता. परंतु कॅन्टोन्मेंट बोर्डकडे पुरेसा निधी नसल्याने राज्य सरकारने कॅन्टोन्मेंटमधील रस्ते बनविण्याची विनंती राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारकडून रस्ते बनविण्याबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांसाठी 6 कोटींची गरज
कॅन्टोन्मेंट हद्दीतील खराब झालेले रस्ते पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी अंदाजे 6 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च राज्य सरकारने करावा अशी विनंती कॅन्टोन्मेंटकडून करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंटमधील कॅम्प व किल्ला येथील अंतर्गत रस्ते पूर्णपणे खराब झाले असून त्यांची त्वरित दुरुस्ती न केल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.