For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विभागाला नादुरुस्त बसचे ग्रहण

10:55 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विभागाला नादुरुस्त बसचे ग्रहण
Advertisement

जुन्या बसेस पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची गरज : राज्यात बेळगाव विभाग उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर : सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्न उपस्थित

Advertisement

बेळगाव : बेळगाव परिवहन विभागामध्ये आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. नादुरुस्त, भंगार गाड्या रस्त्यात मध्येच बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हैराण होऊ लागले आहेत. पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त गळक्या बसेस दुरुस्त करून सुस्थितीत पाठवाव्यात, अशी मागणीही सर्वसामान्य प्रवाशांतून होऊ लागली आहे. बेळगाव आगारात एकूण 634 बसेस आहेत. त्यापैकी 100 बसेस आयुर्मान संपलेल्या असून यापैकी 50 बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. अद्यापि 7 बसेस भंगारात काढण्यात येणार आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एप्रिलअखेरीस 55 बसेस नवीन दाखल झाल्या आहेत. काही भागात बसेसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे दरवाजात लोंबकळत चेंगराचेंगरी करून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ लागला आहे. परिवहनला कोरोना काळात कोट्यावधीचा फटका बसला आहे. दरम्यान, परिवहनकडे आर्थिक चणचण निर्माण झाल्याने बीएमटीसीकडून जुन्या बस खरेदी करण्यात आल्या. मात्र, या बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ब्रेक फेल होणे, टायर पंक्चर होणे, धूर सोडणे, गळती असे प्रकारही पाहावयास मिळत आहेत. परिवहनने नादुरुस्त बसची दुरुस्ती करून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे. शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे.

त्यातच परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या अधिक असल्याने बससेवा पुरवताना अडचणी येऊ लागल्या आहेत. काही बसेसच्या खिडक्या निकामी झाल्या आहेत तर काही बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अशा बसेसची दुरुस्ती करून मार्गांवर सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. राज्यात बेळगाव विभाग उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे. मात्र, बेळगाव आगारातच बसेसचा तुटवडा आहे आणि नादुरुस्त बसेसचा भरणाही अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक बससेवा वारंवार विस्कळीत होऊ लागली आहे. गतवर्षी बिजगर्णी गावाजवळ नादुरुस्त बसचा टायर फुटण्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नादुरुस्त बसचा मुद्दा ऐरणीवर येऊ लागला आहे. सध्या वळीव पावसामुळे मोडक्या नि गळक्या बसमधून प्रवास करणे त्रासदायक ठरू लागले आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त बसेसची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. बेळगाव आगारातून दररोज विविध मार्गांवर शेकडो बसेस धावत असतात. मात्र, या बसेसमध्ये नादुरुस्त भंगारात जाणाऱ्या बसेसची संख्याही अधिक आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सुरक्षित प्रवास म्हणून परिवहनच्या बसकडे पाहिले जाते. मात्र, आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेस रस्त्यांवर सोडल्या जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही धोका निर्माण होऊ लागला आहे. ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने नाईलाजास्तव जुन्या बसेस सोडाव्या लागत आहेत. मात्र, प्रवासादरम्यान अशा बसेसमधून प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तरी परिवहनला जाग येणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Advertisement

जुलैमध्ये नवीन बस

परिवहनच्या ताफ्यातील जुन्या बसेस स्क्रॅपमध्ये काढण्यात आल्या आहेत. नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. त्या विविध मार्गांवर सोडल्या जात आहेत. पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त बसेसची दुरुस्तीही सुरू आहे. येत्या जुलैपर्यंत पुन्हा नवीन बस दाखल होतील.

अनंत शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर

Advertisement
Tags :

.