बेळगाव जिल्हा संघाकडे मिनी ऑलिम्पिक चषक
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षांखालील आंतरजिल्हा मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने मंगळूर जिल्ह्याचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव करून मिनी ऑलिम्पिक चषक पटकाविला. बेळगाव जिल्हा संघाने पहिल्यापासूनच या स्पर्धेत आपले वर्चस्व मिळविले होते. त्यांनी म्हैसूर व मंड्या संघांना पराभूत करून त्यानंतर तिसऱ्या सामन्यात बलाढ्या धारवाड संघाचा 2-1 असा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले होते. धारवाडच्या सामन्यात अब्दुल सय्यद व समर्थ भंडारी यांनी गोल केला. तर धारवाडतर्फे शिव नरेशने एकमेव गोल केला.
दोन्ही गटातून अव्वल स्थान मिळविलेल्या बेळगाव जिल्हा व मंगळूर जिल्हा यांच्यात अंतिम सामना खेळविण्यात आला. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला मंगळूर संघाच्या रितेशने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात बेळगाव जिल्ह्याच्या आराध्य नाकाडीच्या पासवर सकलेन मुल्लाने बरोबरीचा गोल करून सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अपयश आले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांचे गोलफलक समान राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्याने 4-3 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगावतर्फे अब्दुलमतीन सय्यद, आराध्य नाकाडी, समर्थ भंडारी यांनी गोल केले. तर मंगळूरतर्फ रितेश आणि संगमेश यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्यात गोलरक्षक उज्वेर रोटीवालेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवित संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. सामन्यानंतर कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे प्रमुख सचिव एम. कुमार, सहसचिव अस्लम खान, श्रवणन, स्पर्धा सचिव डॉ. अँथोनी, पंच कमिटीचे अध्यक्ष गोपाल आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव जिल्हा व उपविजेत्या मंगळूर जिल्हा संघाला चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.
या संघात समर्थ भंडारी, सिफेत शेख, सुमीत गांगेकर, विराट भोसले, अब्दुल मतीन सय्यद, विनीत कुरबर, आयुष्यमान निंगनूर, जियान मुल्ला, अरकान बडेघर, शाहिदली सय्यद, निल गायकवाड, ओमकार मुदकापागोळ, नवीन पतकी, सकलेन मुल्ला, दक्ष मुळे, ध्रृव गायकवाड, आराध्य नाकाडी आदी खेळाडूंचा समावेश आहे. विजेत्या संघाचे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.