बेळगाव जिल्ह्याला आज ‘रेड’ तर उद्या ‘ऑरेंज अलर्ट’
बेंगळूर : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून मंगळवारपासून सर्वत्र पाऊस होत आहे. बेळगाव, धारवाड, गदग या जिल्ह्यांना गुरुवार 12 रोजी ‘रेड अलर्ट’ तर 13 आणि 14 रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.बुधवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये वरुणराजाने हजेरी लावली. गुरुवारी बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, रामनगर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, हासन, म्हैसूर, चामराजनगर, चित्रदुर्ग, दावणगेरे, विजयनगर, बळ्ळारी, रायचूर, मंड्या, बागलकोट, विजापूर, कलबुर्गी, यादगिरी या जिल्ह्यांना पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला असून उडपी, मंगळूर, कारवार, मलनाड भागातील चिक्कमंगळूर, शिमोगा आणि शिमोगा या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या सहा जिल्ह्यांना 12 ते 15 जूनपर्यंत ‘रेड अलर्ट’ दिला आहे. या कालावधीत येथे 204 मी. मि. पर्यंत पाऊस होण्याचे अनुमान आहे. बुधवारी मंगळूर जिल्ह्यांतील मंगळूर विमानतळ, कोटा, मुल्की, उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर, उडुपी शहर, म्हैसूर, दावणगेरे आणि चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील गौरीबिदनूर तालुक्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला.