For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहयो राबविण्यात बेळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर

11:15 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहयो राबविण्यात बेळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर
Advertisement

दुष्काळी परिस्थितीत समर्पक रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्हा पंचायतला यश : अधिकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी

Advertisement

बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळावा तसेच अकुशल कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली रोजगार हमी योजना राबविण्यात बेळगाव जिल्हा राज्यामध्ये आघाडीवर आहे. 1 कोटी 26 लाख 12 हजार 899 मानव दिन रोजगार उपलब्ध करून देऊन 2022-23 या आर्थिक वर्षात बेळगाव जिल्हा आघाडीवर राहिला आहे. अनुक्रमे रायचूर, कोप्पळ, विजयनगर, चित्रदुर्ग, तुमकूर, कलबुर्गी, बळ्ळारी, बिदर, बागलकोट या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. रोजगारासाठी ग्रामीण भागातील जनता स्थलांतरित होऊ नये. आहे त्या ठिकाणीच त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात बेळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. बेळगाव जिल्ह्याला गेल्या आर्थिक वर्षामध्ये 130 लाख मानव दिन रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार 126.13 लाख मानव दिन रोजगार उपलब्ध करून देण्यात बेळगाव जिल्हा पंचायतीला यश आले आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात ग्रामीण भागामध्ये नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. याची दखल घेऊन ग्राम पंचायतीनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्हा पंचायत यशस्वी ठरल्याने जि. पं. अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. याबरोबरच दुष्काळी परिस्थितीवरुन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यावरून मागेल त्याला रोजगार हेल्पलाईन सुरू केल्याने अधिक मदत झाली असल्याचे जि. पं. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

रायचूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

Advertisement

राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर बेळगाव जिल्हा असून दुसऱ्या क्रमांकावर 1 कोटी 23 लाख 86 हजार 898 मानव दिन रोजगार उपलब्ध करून देऊन रायचूर जिल्हा आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोप्पळ जिल्हा असून 98 लाख 47 हजार 651, चौथ्या क्रमांकावर विजयनगर 78 लाख 68 हजार 976, पाचव्या क्रमांकावर चित्रदुर्ग असून 67 लाख 23 हजार 336 मानव दिन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.