बेळगाव-दिल्ली विमानफेरी रविवारपासून होणार नियमित
तांत्रिक कारणाने विमानफेरी होती बंद
बेळगाव : इंडिगो एअरलाईन्समध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मध्यंतरी बेळगाव विमानळातून उड्डाण घेणाऱ्या विमानफेऱ्या रद्द झाल्या होत्या. परंतु आता विमानसेवा पूर्वपदावर आली आहे. रविवार दि. 14 डिसेंबरपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरी नियमित सुरू होईल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिल्लीसह इतर शहरांच्या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरातून सध्या बेंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, मुंबई व दिल्ली येथे विमानसेवा सुरू आहेत. केवळ विमान कंपन्यांमधील कर्मचारी कमी असल्यामुळे काही दिवसांसाठी विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु या सेवा कायमच्या रद्द झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. बेळगावच्या वाट्याच्या सर्व सेवा सुरळीत पद्धतीने सुरू असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मागील आठवड्यात इंडिगोच्या काही सेवा ठप्प होत्या. या आठवड्यातही दि. 8 ते 13 डिसेंबर दरम्यान बेळगाव-दिल्ली विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. परंतु त्यानंतर रविवारपासून विमानफेरी पुन्हा नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमान प्रवासाचा आनंद घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
बेळगावमधून कोणतीही विमानसेवा बंद नाही
बेळगावमधून कोणतीही विमानसेवा सध्या बंद झालेली नाही. मध्यंतरी विमान कंपन्यांच्या काही तांत्रिक कारणांमुळे विमानसेवा रद्द करावी लागली होती. पुढील आठवड्यापासून दिल्लीसह सर्वच सेवा सुरळीत होणार आहेत. प्रवाशांनी बेंगळूरसह हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, मुंबई व दिल्ली या शहरांना विमान प्रवास सुरू करावा.
- एस. त्यागराजन (विमानतळ संचालक)