For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-चोर्ला मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद

11:44 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव चोर्ला मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद
Advertisement

जांबोटीत वाहनांच्या रांगा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू : खानापूर तहसीलदारांकडून पाहणी

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरून गोव्याला मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. पण कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन पुलाला धोका निर्माण झाल्यामुळे, या पुलावरून अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्याचा आदेश, दोन दिवसापूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यामुळे पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे. शनिवारी जांबोटी येथे पोलिसांकडून गोव्याहून बेळगावला जाणारी सुमारे 50 अवजड वाहने रस्त्यावरच अडविण्यात आल्यामुळे, मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

Advertisement

बेळगाव-चोर्ला व्हाया पणजी राज्य महामार्गावर कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवर सुमारे 125 वर्षांपूर्वीच्या जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून अद्यापही प्रवासी व महालवाहतूक सुरूच आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव-पणजी व्हाया अनमोड राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीला कारवारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्यामुळे, गोव्याला ये-जा करणारी डबल एक्सल अवजड वाहनानी आपला मोर्चा बेळगाव-चोर्ला व्हाया पणजी असा वळविल्यामुळे, या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका निर्माण झाला असून, कोणत्याहीक्षणी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील अंतरराज्य वाहतूक ठप्प होण्याची भीती असल्याने बेळगाव-गोवा प्रवासी वाहतूकवरही परिणाम होणार आहे.

जांबोटी-कणपुंबी भागातील जनतेचे हाल

बेळगाव, गोवा येथील प्रवासी वर्गाबरोबरच जांबोटी-कणपुंबी भागातील जनतेचे हाल होणार असल्याने रस्त्यावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावी अशा मागणीचे निवेदन चार दिवसापूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत अध्यक्ष किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची त्वरित दखल घेऊन बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील अवजड वाहतुकीच्या बंदीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी त्वरित सुरू केली असून, या मार्गावरून वाहतूक करणारी सुमारे 50 वाहने शनिवारी जांबोटी येथें अडविण्यात आली आहेत.

जांबोटी बसस्थानक परिसरात चक्काजाम

सदर वाहनांना जाबोटी-व्हाया खानापूर-बेळगाव असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. मात्र वाहनधारकांनी जांबोटी बसस्थानक परिसरात चक्काजाम केल्यामुळे रात्रीच्यावेळी पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

खानापूर तहसीलदाराकडून पाहणी

दरम्यान खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी शनिवारी सायंकाळी जांबोटीला धावती भेट देऊन वाहन चालकांबरोबर चर्चा केली. तसेच त्यांनी कुसमळी येथील ब्रिटिश कालीन पुलाची ही पाहणी केली आहे.

अवजड वाहतूक बंदचा आदेश

गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी जांबोटी-खानापूर व बेळगाव-जांबोटी या दोन्ही मार्गांवर अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे. शनिवारी सकाळपासूनच पोलिसांनी या मार्गावर फलक लावून वाहतूक वळविली होती.

Advertisement
Tags :

.