For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावचे विमान पुन्हा जमिनीकडे

07:45 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगावचे विमान पुन्हा जमिनीकडे
Advertisement

हुबळीपेक्षा प्रवासी संख्या निम्म्यावर : शहराच्या विकासालाही फटका

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

तीन-चार वर्षांपूर्वी राज्यात प्रवासी संख्येत तिसऱ्या स्थानी असलेल्या बेळगाव विमानतळाची आता मात्र प्रवासी संख्येत प्रचंड घसरण झाली आहे. शेजारील हुबळी विमानतळापेक्षा प्रवासी संख्या निम्म्यावर आल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी आकाशाकडे झेपावलेले बेळगावचे विमान आता पुन्हा जमिनीच्या दिशेने येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Advertisement

ऑगस्ट महिन्यात बेळगावमधून केवळ 15 हजार 91 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची आकडेवारी नुकतीच विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी महिन्याला 30 ते 32 हजार प्रवासी बेळगावला पसंती देत होते. यामुळे चिंता वाढली असून विमानसेवांमध्ये घट झाल्याने प्रवाशांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. प्रवासी संख्येत काही वर्षांपूर्वी बेंगळूर, मंगळूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर बेळगाव तिसऱ्या स्थानी होते. परंतु सध्या मात्र ही क्रमवारी घसरली आहे.

बेळगावपासून जवळच असलेल्या हुबळी विमानतळावरून ऑगस्ट महिन्यात 28 हजार 968 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. बेळगावमधून 1.5 मे. टन माल वाहतूक झाली आहे तर हुबळीमधून 11.3 मे. टन माल वाहतूक करण्यात आली आहे. बेळगावमधून 257 विमानांची ये-जा होती तर हुबळीतून 441 विमानांचे उ•ाण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे घसरलेला हा टक्का बेळगाव शहराच्या विकासासाठी मारक ठरणार आहे.

लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेणे आवश्यक

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत बेळगावमधून दररोज 12 ते 13 विमानांची ये-जा असायची. सध्या ही संख्या तीन ते चारवर पोहोचली आहे. बेंगळूर, हैदराबाद, नवी मुंबई व दिल्ली या केवळ चार शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू आहे. तसेच स्टार एअरने बेळगावमधील आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे एकमेव इंडिगो एअरलाईन्सवर बेळगाव विमानतळाचा डोलारा उभा आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे.

ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी

   बेळगाव                        हुबळी

प्रवासी संख्या                     15,091                         28,968

विमानांची ये-जा                   257                            441

कार्गो वाहतूक                  1.5 मे. टन                     11.3 मे. टन

Advertisement
Tags :

.