तामिळनाडूतील वकिलावरील हल्ल्याचा बेळगाव बार असोसिएशनतर्फे निषेध
हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी
बेळगाव : तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्याच्या होसूर न्यायालय आवारात वकिलावर झालेल्या चाकू हल्ल्याचा बेळगाव बार असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनने केली असून पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दि. 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे निवेदन दिले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. होसूर न्यायालयाचे वकील कण्णन हे न्यायदानाचे काम पूर्ण करून न्यायालयाबाहेर येत असताना आनंद नामक व्यक्तीने वकील कण्णन यांच्यावर चाकू हल्ला केला. न्यायदानाचे काम करणाऱ्या वकिलावर हल्ला करणे हे अशोभनीय आहे. अशा प्रकारामुळे वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयामध्ये खरी बाजू कोणती व चुकीची बाजू कोणती यावर सारासार विचार करून न्यायाधीशामार्फत वकिलांना निकाल द्यावा लागतो. न्यायदानात पारदर्शकता असावी लागते. न्यायांग विभाग हे कार्य चोखपणे बजावत असतो. पण निकाल आपल्या बाजूने लागला नाही या मानसिकतेतून वकिलांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत असतात. अशा घटनांमुळे वकिलांमध्येही भीती निर्माण होत आहे. होसूर न्यायालय आवारात झालेल्या घटनेचा बेळगाव बार असोसिएशन तीव्र निषेध तर करीत आहेच. तसेच कण्णन कुटुंबीयाला पाठिंबा देत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हल्लेखोर आनंदवर कठोर कारवाई करण्यासाठी तामिळनाडू सरकारला विनंती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर यासह अन्य पदाधिकारी व सदस्य निवेदन देताना उपस्थित होते.