बेळगाव विमानतळाची ‘समाधानी’ कामगिरी
प्रवासी समाधान यादीत देशात सातवा क्रमांक, हुबळीला टाकले मागे
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळावर प्रवाशांना उत्तम सेवा मिळत असल्याने प्रवासी समाधानी आहेत. देशभरातील विमानतळांच्या प्रवासी समाधान रँकमध्ये बेळगावने सातवा क्रमांक पटकाविला आहे. देशातील 62 विमानतळांमध्ये पहिल्या दहांमध्ये क्रमांक मिळविल्याबद्दल बेळगावच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही विमानतळावर अशाच प्रकारच्या उत्तम सेवा मिळाव्यात, अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून दरवर्षी देशातील विमानतळांचे ग्राहक समाधान रँक ठरविले जातात. यासाठी प्रवाशांचे अभिप्राय घेतले जातात. तसेच विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा समावेश या रँकमध्ये केला जातो. 5 पैकी 4.94 गुण बेळगाव विमानतळाने मिळविले आहेत. विमानतळावरील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची सेवा, साहित्याची हाताळणी यासह इतर सुविधांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात येते.
हुबळी विमानतळापेक्षा बेळगाव सरस
बेळगाव विमानतळावरील अनेक विमानसेवा हुबळीला नेल्याचा आरोप प्रवासीवर्गातून केला जातो. हुबळी विमानतळाचा दर्जा वाढविण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्र्यांकडून प्रयत्न सुरू असतात. तरीदेखील बेळगावच्या विमानतळाने प्रवासी समाधानात हुबळी विमानतळाला मागे टाकले आहे. हुबळी विमानतळाला आठवा रँक मिळाला असून बेळगावला सातवा रँक मिळाला आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून आता तरी बेळगावमधील सेवा वाढविण्याची मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.
बेळगावला 4.94 गुण
विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी समाधान रँकिंग नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बेळगावने 4.94 गुण मिळवून देशात सातवा रँक मिळविला आहे.
- त्यागराज (विमानतळ संचालक)