For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळाची प्रवासी संख्येत चढती कमान

10:59 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळाची प्रवासी संख्येत चढती कमान
Advertisement

हुबळीपेक्षा बेळगावला अधिक पसंती : दिल्ली, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद विमानफेऱ्यांना उत्तम प्रतिसाद

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळावरून वाढलेली प्रवासी वाहतूक पाहता हुबळीपेक्षाही ती सरस ठरली आहे. मागीलवर्षी व यावर्षीच्या एप्रिल महिन्याची तुलना करता तब्बल 61 टक्क्यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. राज्यात विमान प्रवासी संख्येत वाढ होणारे हे पहिलेच विमानतळ आहे. त्यामुळे शेजारील हुबळी, कलबुर्गी या विमानतळांपेक्षाही बेळगाव विमानतळ सरस ठरले आहे. बेंगळूर व मंगळूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. त्यामुळे देशाबरोबरच इतर देशांमधील प्रवाशांची ये-जा सुरू असते. यानंतरची सर्वाधिक प्रवासी संख्या ही बेळगावमध्ये आहे. मंगळूर विमानतळ कोस्टल कर्नाटक विभागात येत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी असते. तसेच नामांकित कॉलेज, मेडिकल कॉलेज यामुळे प्रवासी संख्या नेहमीच अधिक असते.

बेळगाव व हुबळी या दोन्ही विमानतळांवर मागील काही वर्षांत प्रवासी संख्या समान होती. तरीदेखील राजकीय दबावाने बेळगावच्या हिश्यातील काही विमानफेऱ्या हुबळीला नेण्यात आल्या. यामुळे प्रवाशांकडून बराच विरोध झाला. एप्रिल 2024 मध्ये बेंगळूर विमानतळावरून 32 लाख प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या मागीलवर्षी 30 लाख होती. हुबळी विमानतळावरून एप्रिल 2023 मध्ये 31 हजार 539 प्रवाशांनी प्रवास केला होता. परंतु, एप्रिल 2024 मध्ये ही संख्या 23 हजार 488 वर पोहोचली असल्याने 44 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बेळगाव विमानतळावरून एप्रिल 2024 मध्ये 31 हजार 060 प्रवाशांनी विमान प्रवास केला. एप्रिल 2023 मध्ये ही संख्या 18 हजार 922 वर होती. त्यामुळे तब्बल 64 टक्क्यांनी प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या बेळगावमधून बेंगळूरसाठी दररोज दोन तर दिल्लीसाठी रोज एक विमान इंडिगोने सुरू केल्याने प्रवासी संख्या झपाट्याने वाढली. त्याबरोबरच मुंबई, हैदराबाद या विमानफेऱ्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे इतर विमानतळांच्या तुलनेमध्ये बेळगाव विमानतळ सरस ठरले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.