For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळाला उतरती कळा

06:55 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळाला उतरती कळा
Advertisement

उडान योजनेची समाप्ती : लोकप्रतिनिधींचीही उदासीनता

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विमानतळातील सेवा आता हळूहळू कमी झाली आहे. सध्या केवळ तीन शहरांना सेवा दिली जात आहे. स्टार एअरनेही बेळगाव-मुंबई विमानसेवा थांबवल्याने प्रवाशांना आता गोवा व हुबळी या पर्यायी विमानतळांचा वापर करावा लागत आहे. उडान योजनेचा संपलेला कालावधी व लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे सध्या मोजक्याच विमानसेवा शिल्लक राहिल्या आहेत.

Advertisement

उडान-3 योजनेत बेळगावची निवड झाल्यानंतर बेळगावमधून दहा ते बारा शहरांना विमानसेवा सुरू झाल्या. पाच वर्षांपूर्वी इंडिगो, स्टार एअर, एअर इंडिया (अलायन्स), स्पाईस जेट व टू जेट या विमान कंपन्या सेवा देत होत्या. त्यावेळी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, तिरुपती, कडाप्पा, हैद्राबाद, म्हैसूर, बेंगळूर, चेन्नई, जयपूर, सूरत, अहमदाबाद, दिल्ली या शहरांना विमाने उपलब्ध असल्याने महिनाकाठी 30 ते 35 हजार प्रवासी विमानाने प्रवास करत होते. केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, चंदगड व कोकणातूनही प्रवासी विमानाने प्रवास करत असल्याचे दिसून आले होते.

उडान योजनेचा कालावधी संपताच अनेक विमान कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्या. तसेच तिकिटाचे दरही वाढले. काही वर्षांपूर्वी स्टार एअर विमान कंपनीचा हब बेळगावमध्ये होता. दोन ते तीन विमाने नाईट पार्किंगसाठी बेळगावमध्ये होती. परंतु कंपनीने आपला विस्तार वाढवल्याने हळूहळू सर्व सेवा कमी होत गेल्या. मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेली बेळगाव-मुंबई ही फेरी त्यांनी मागे घेतल्याने सध्या स्टार एअरच्या फेऱ्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत.

सध्या केवळ इंडिगो एअरलाईन्स ही एकमेव विमान कंपनी बेळगावमध्ये उपलब्ध आहे. दिल्ली, नवी मुंबई, हैद्राबाद व बेंगळूर या शहरांना इंडिगो सेवा देत आहे. विमानसेवा कमी झाल्याने त्याचा परिणाम प्रवासी संख्येवरही दिसून आला आहे. विमानसेवा कमी होत असतानाही लोकप्रतिनिधींनी कोणतीही हालचाल केली नसल्याची तक्रार आता विमान प्रवाशातून व्यक्त केली जात आहे.

बेळगावमधील संघटना गप्प का?

बेळगाव हे शिक्षण व उद्योगाचे हब आहे. बेंगळूरनंतर सर्वाधिक जीएसटी ही बेळगावमधून राज्य सरकारला मिळते. येथील उद्योजक, व्यापारी दररोज मोठ्या शहरांना प्रवास करत असतात. त्यामुळे किमान चेंबर ऑफ कॉमर्स, स्मॉल स्केल इंडस्ट्री, क्रेडाई यासह इतर संघटनाही याबाबत बोलताना दिसत नाहीत. पण बाजूच्या हुबळी विमानतळासाठी उत्तर कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स प्रयत्नशील असल्याचे दिसून येत असल्याने बेळगावच्या उद्योजकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Advertisement
Tags :

.