For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळवट्टी गाव नागरी सुविधांपासून वंचित

10:31 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळवट्टी गाव नागरी सुविधांपासून वंचित
Advertisement

ग्राम पंचायतीचे विविध कामांकडे दुर्लक्ष : नागरिकांमधून तीव्र संताप : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विकासकामांकडे लक्ष देण्याची गरज 

Advertisement

वार्ताहर /किणये

बेळगाव शहरापासून पश्चिम भागात 22 किलोमीटर अंतरावर असलेले बेळवट्टी गाव अनेक नागरी सुविधांपासून वंचित आहे. बेळवट्टी गावाने राकसकोप धरणासाठी आपल्या गावच्या जमिनी दिलेल्या आहेत. हे गाव पुनर्वसित असूनही गावातील नागरिकांसाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. गावातील नागरिकांच्या मागण्यांचा ग्राम पंचायत विचार करत नाही. तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांमधून होत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यातही ग्राम पंचायतीमार्फत प्रत्येक गावाचा विविध कामांच्या विकासासाठी प्रशासनाच्या काही योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जातो.

Advertisement

मात्र बेळवट्टी गावातील गटारी, स्मशानभूमी, पाणी पुरवठा यांची सध्याची परिस्थिती पाहता या गावासाठी निधी उपलब्ध होतो की नाही? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. बेळवट्टी गावातील गल्ल्यांमधील गटारींची साफसफाई करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी गटारी कचऱ्याने आणि मातीने पूर्णपणे भरलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा व गटारीमधून जाणाऱ्या सांडपाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. गावात पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी बांधण्यात आलेली आहे. मात्र या टाकीच्या बाजूला चिखल व मातीची दलदल आहे. काही ठिकाणी पाणी पुरवठा होत असलेल्या पाईप लाईनला गळती लागलेली आहे.

यामुळे नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने सध्या डेंग्यू व चिकुन गुनिया या रोगाचे फैलाव वाढलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांसाठी शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी ही ग्राम पंचायतीची आहे. मात्र ग्राम पंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. बेळवट्टी गावच्या स्मशानभूमीमध्ये गेल्या चार-पाच वर्षापूर्वी शेडची उभारणी केली आहे. मात्र गेली दोन वर्षे या शेडचे पत्रे उडून गेलेले आहेत. यामुळे अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पावसात भिजतच अंत्यविधी करावा लागत आहे. स्मशानभूमीत शेड उभारणी केली आहे. परंतू याची दुरवस्था झाली आहे. तसेच शवदाहिनी अद्यापही बसविण्यात आलेली नाही, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.

दोन-तीन वर्षांपासून ग्रामसभा नसल्याने समस्या जैसे थे 

बेळवट्टी ग्रामपंचायतीमध्ये पीडीओ व ग्राम पंचायत सदस्य यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून ग्राम पंचायतीने ग्रामसभा घेतली नाही. जर ग्रामसभाच घेण्यात आली नाही तर सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या मांडणार कोणाकडे? पाईपलाईनला गळती लागल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित येऊ लागले आहे. गावात रोगराई पसरल्यावरच ग्राम पंचायतला जाग येणार का? स्मशानभूमीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी गटारी साचलेल्या आहेत. त्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच दोन वर्षापासून औषधाची फवारणी करण्यात आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- संतोष नलवडे, बेळवट्टी

Advertisement
Tags :

.