For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशिया, बेलारूसचे खेळाडू ऑलिम्पिक उद्घाटन समारंभापासून वंचित

06:08 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशिया  बेलारूसचे खेळाडू ऑलिम्पिक उद्घाटन समारंभापासून वंचित
Advertisement

वृत्तसंस्था/ जिनिव्हा

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना पारंपरिक संचलनात भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी स्पष्ट केले आहे. 26 जुलै रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात स्टेडियममधील संघांच्या सामान्य संचलनाऐवजी हजारो अॅथलीट सीन नदीतून नौकेतून अनेक मैल अंतर कापत आयफेल टॉवरकडे प्रवास करताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे की, रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये तटस्थ म्हणून भाग घेण्यास मान्यता देण्यात आली असून त्यांना हा कार्यक्रम फक्त अनुभवण्याची संधी मिळेल. जास्त करून नदीजवळून त्यांना हा कार्यक्रम पाहता येईल. आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीने दोन आठवड्यांपूर्वी 28 ऑगस्ट रोजीच्या पॅरिसमधील पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या संदर्भात बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आयओसीचा हा निर्णय आला आहे.

Advertisement

युक्रेनमधील युद्धामुळे रशिया व बेलारूसला ऑलिम्पिकमधील सांघिक खेळांपासून प्रतिबंधित करण्यात आले आहे आणि ‘आयओसी’ने त्या देशांतील वैयक्तिक स्पर्धांत उतरणाऱ्या खेळाडूंना तटस्थ दर्जा मिळावा यासाठी दोन टप्प्यांची तपासणी प्रक्रिया तयार केली आहे. त्या खेळाडूंना प्रथम त्यांच्या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने आणि नंतर ‘आयसीसी’कडून नियुक्त पुनरावलोकन मंडळाने मान्यता द्यावी लागेल. तटस्थ खेळाडूंनी युक्रेनवरील आक्रमणाला सार्वजनिकरीत्या समर्थन दिलेले नसावे किंवा ते लष्करी वा सरकारी सुरक्षा यंत्रणेशी संलग्न असता कामा नयेत, अशी घालण्यात आली आहे. मात्र ‘सीएसकेए’सारख्या रशियन लष्करी क्रीडा क्लबचे सदस्यत्व तटस्थ स्थिती नाकारण्यास कारणीभूत ठरू शकेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

‘आयओसी’ने मंगळवारी सांगितले की पॅरिस खेळांसाठी रशियन पासपोर्ट असलेले सुमारे 36 तटस्थ खेळाडू आणि बेलारूचा पासपोर्ट असलेले 22 खेळाडू पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे. त्या खेळाडूंना 11 ऑगस्टच्या समारोप समारंभात भाग घेण्याची परवानगी द्यावी की नाही याबाबतचा निर्णय नंतरच्या टप्प्यात घेतला जाईल, असे ‘आयओसी’ने सांगितले आहे. तटस्थ खेळाडूंनी जिंकलेली पदके ही पदक तालिकेत सामूहिक गट म्हणून गणली जाणार नाहीत. दरम्यान, कथित सरकारी हस्तक्षेपामुळे ग्वाटेमालाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेवर 18 महिन्यांपूर्वी लादलेले निलंबन ‘आयसीसी’ने उठविले आहे.

Advertisement
Tags :

.