भरपूर परतावा देण्याचे सांगणाऱ्या बेळगावच्या महिलेला पुणे पोलिसांकडून अटक
दहाहून अधिक जणांची 3 कोटींची फसवणूक
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
आर्थिक संस्थेत केलेल्या गुंतवणुकीला भरपूर परतावा देण्याचे सांगून गुंतवणूकदारांना ठकवल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी बेळगाव येथील एका महिलेला अटक केली आहे. राजश्री (वय 42) असे त्या महिलेचे नाव आहे. दहाहून अधिक जणांना 3 कोटी रुपयांना फसवल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी या महिलेला अटक करून पुण्याला नेले आहे. रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास भरपूर नफा देण्याचे सांगून अनेकांकडून रक्कम गुंतवून घेण्यात आली आहे.
एकूण गुंतवणुकीच्या 30 टक्के रक्कम शेअरमार्केटमध्ये गुंतवली जाते. उर्वरित 70 टक्के रक्कम सुरक्षित ठेवली जाते. त्यामुळे तुमचा पैसा परत मिळणार, असा विश्वास देऊन पुढील पाच वर्षांच्या तारखा घालून गुंतवणूकदारांना धनादेश दिले जात होते. परिचयातील लोकांनाही गुंतवणूक करायला सांगा, असे सांगितले जात होते. परतावा बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी पुणे येथील शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.