बेळगावला जागतिक क्रमवारीत मानाचे स्थान
‘संधींचे शहर’ विभागात 683 वा क्रमांक : हुबळी-धारवाड 707 व्या क्रमांकावर
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : प्रतिष्ठित ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026’ची क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. जगातील प्रमुख 1,000 शहरांच्या यादीत राज्यातील एकूण सहा शहरांनी स्थान मिळवले आहे. भारतीय शहरांमध्येही बेंगळूरने उल्लेखनीय स्थान मिळवत 311 वा जागतिक क्रमांक पटकावला आहे. तर म्हैसूरला ‘जागतिक आकर्षणाचे वारसा शहर’ या विभागात 628 वे स्थान मिळाले आहे. मंगळूरला ‘वाढीला चालना देणारे किनारी केंद्र’ या विभागात 665 वा क्रमांक मिळाला आहे. तसेच बेळगावला ‘संधींचे शहर’ या विभागात 683 वे तर हुबळी-धारवाडला ‘अभियांत्रिकी, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र’ या विभागात 707 वे जागतिक स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त, ‘समृद्ध वारसा, वाढते भविष्य’ या विभागात कलबुर्गीला 781 वे जागतिक स्थान मिळाले आहे.
या क्रमवारीत शहरांचे अर्थव्यवस्था, मानवी भांडवल, जीवनमान, पर्यावरण आणि प्रशासन या पाच प्रमुख जागतिक निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे. राज्यातील बेळगाव, हुबळी-धारवाड, बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर आणि कलबुर्गी या सहा शहरांचा या जागतिक यादीत समावेश झाला आहे. या यादीत मुंबई 330 व्या, चेन्नई 381 व्या तर हैदराबाद 421 व्या क्रमांकावर आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ही जगातील प्रमुख स्वतंत्र आर्थिक सल्लागार संस्थांपैकी एक असून 200 हून अधिक देश, 100 औद्योगिक क्षेत्रे तसेच सुमारे 8,000 शहरे व प्रदेशांचा अभ्यास करते. जागतिक आर्थिक परिस्थितीतील बदल, शहरांची वाढ आणि भविष्यातील आर्थिक शक्मयता याबाबत संस्थेकडून विविध विश्लेषणे केली जातात.
2026 च्या ऑक्सफर्ड ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये भारतातील 100 शहरांना जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले आहे. यामुळे जागतिक शहरांच्या व्यवस्थेत भारतीय शहरांचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. या क्रमवारीत बेंगळूरला ‘भारताची नवोन्मेष राजधानी’ या विभागात 311 वा जागतिक क्रमांक मिळाला आहे.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या शहर आणि प्रदेश विषयक तज्ञांच्या टीमकडून हा निर्देशांक तयार केला जातो. 40 हून अधिक अर्थतज्ञांचा समावेश असलेल्या या टीमकडे शहरांशी संबंधित आकडेवारी, शहरी विकास आणि भविष्यातील आर्थिक अंदाज याबाबत विशेष तज्ञता आहे. कर्नाटकातील सहा शहरांचा या जागतिक क्रमवारीत झालेला समावेश राज्यातील विविध शहरांच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि मानवी विकासाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.
अभिमानास्पद
ऑक्सफर्ड ग्लोबल सिटीज इंडेक्स : राज्यातील सहा शहरे
मुंबई 330, चेन्नई 381, हैदराबाद 421 व्या क्रमांकावर