बेळगावात गणेश विसर्जनाला तब्बल 42 तास; जल्लोषात लाडक्या बाप्पाला निरोप
बेळगाव | प्रतिनिधी : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर बेळगावात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 42 तास चालली. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता माळी गल्लीतील पहिल्या श्रीमूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात झाली, तर रविवारी दुपारी 12 वाजता महापालिकेच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.
हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चौक मंडळाच्या मानाच्या श्रीमूर्तीची पूजा व आरती करून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. रात्री नऊच्या सुमारास गर्दीत आणखी वाढ झाली.
संयुक्त महाराष्ट्र चौक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तीचे शुक्रवारी रात्री 8 वाजता कपिलेश्वर तलावात सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रीमूर्ती विसर्जनस्थळी दाखल होऊ लागल्या. विसर्जनाची यंत्रणा सज्ज असतानाही श्रीमूर्तींची संख्या आणि वाढती गर्दी यामुळे विसर्जन प्रक्रिया संथगतीने सुरू राहिली.
मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजेचा गजर सुरू असल्याने तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने गणेशभक्त मिरवणूक पाहण्यासाठी शहरात दाखल झाले होते. शहराबाहेरील विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांना मिरवणूक मार्गावर प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे अनेक नागरिकांनी वाहने दूरवर उभी करून पायी मिरवणूक मार्ग गाठला.
गणेशभक्तांचा उत्साह आणि संथगतीने सुरू असलेल्या विसर्जनामुळे सार्वजनिक गणेशमूर्तींना रांगेत थांबावे लागले. रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलावांवर आठ श्रीमूर्तींचे विसर्जन बाकी होते.
विसर्जन प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावावर एकूण नऊ क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी लाईफ जॅकेट आणि जलतरणपटूंची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीमूर्ती विसर्जनस्थळी आल्यानंतर आरती करून त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात येत असल्याने प्रत्येक मूर्तीला काही वेळ लागत होता.
अखेर रविवारी दुपारी 12 वाजता महापालिकेच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेतली असतानाही विसर्जन प्रक्रिया संथगतीने सुरू राहिल्याने यंदा मिरवणुकीला तब्बल 42 तासांचा कालावधी लागला.