रेशनकार्डधारकांच्या ई-केवायसीत बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल
78.91 टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश : उर्वरित लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : रेशनकार्डधारकांची ई-केवायसी करण्यात बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 17 लाख 71 हजार 506 जणांची ई-केवायसी करण्याचे काम पूर्ण झाले असून 78.91 टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत उर्वरित 4 लाख 73 हजार 354 जणांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांपूर्वी रेशनकार्डवरील ज्या सदस्यांनी ई-केवायसी केली होती, त्यांची पुन्हा ई-केवायसी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बोगस आणि मयत लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी ई-केवायसी केली जात आहे. जिल्ह्यातील 22 लाख 44 हजार 860 जणांची ई-केवायसी केली जाणार आहे. जे रेशनकार्डवरील सदस्य ई-केवायसी करणार नाहीत, त्यांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी सर्व्हर समस्या निर्माण झाल्याने ई-केवायसी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले. त्यातच रेशन घेण्यासाठी रेशनकार्डधारकांना दोन वेळा बायोमेट्रिक द्यावे लागले. त्यामुळे ई-केवायसी करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली. राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी बेळगाव जिल्हा ई-केवायसी करण्यात अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत 78.91 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर विजापूर जिल्हा असून 77.30 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. तर सर्वात पिछाडीवर बिदर जिल्हा असून त्या ठिकाणी केवळ 46.48 टक्के ई-केवायसीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
ई-केवायसी करण्याचा अखेरचा दिवस 10 ऑक्टोबर असल्याचे अन्न व नागरीपुरवठा खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित नऊ दिवसात जिल्ह्यातील 4 लाख 73 हजार 354 जणांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा खात्याची धडपड सुरू आहे. यासाठी रेशन दुकानदारांना सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर ई-केवायसी करण्यासाठी अॅप उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत बुधवारी अन्न व नागरीपुरवठा खात्याची बैठक झाली असून त्या ठिकाणी नवीन अॅपसंदर्भात चर्चा झाली आहे. लवकरच यावर निर्णय घेतला जाणार आहे. अॅपचे लोकार्पण झाल्यास रेशनकार्डधारकांना घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे.